भारतात सध्या वन डे विश्वचषक खेळवला जात असून यजमान टीम इंडिया पाच विजयांसह क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. यंदाच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार म्हणून भारतीय संघाकडे पाहिले जात आहे. अशीच कामगिरी देखील रोहितसेनेने करून तमाम भारतीयांच्या स्वप्नाकडे कूच केली. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा पराभव करून दहा गुण मिळवले. तब्बल १२ वर्षांनंतर भारतात वन डे विश्वचषक होत आहे, त्यामुळे यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघ दहा वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवेल अशी भारतीयांना आशा आहे.
दरम्यान, शेवटच्या वेळी भारताने २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात विश्वचषक उंचावला होता. याशिवाय २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात भारताला यश आले होते. पण, त्यानंतर एकदाही भारताला आयसीसी इव्हेंटमध्ये किताब पटकावता आला नाही. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळख असलेल्या धोनीने देखील यंदा भारत विश्वचषक जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.
समजणाऱ्याला इशारा पुरेसा असतो - धोनी धोनीला एका कार्यक्रमात २०२३चा विश्वविजेता भारतीय संघ बनेल का याबाबत प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना त्याने म्हटले, "भावना समजून घ्या, विद्यमान भारतीय संघ चांगला आहे. संघातील सर्वच खेळाडू अप्रतिम कामगिरी करत आहेत. याहून अधिक मी काही बोलू शकत नाही. समजणाऱ्याला इशारा पुरेसा असतो." तसेच लोकांनी मला एक चांगला माणूस म्हणून लक्षात ठेवावं हिच माझी इच्छा असल्याचेही धोनीने यावेळी नमूद केले.
IPL २०२४ बद्दल म्हणाला...धोनीने आयपीएल २०२४ मध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. "मी केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, आयपीएलमधून नाही. इथे चेन्नई सुपर किंग्जचे देखील चाहते आहेत. गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि विश्रांती घेत आहे. डॉक्टरांनी सांगितले होते की, नोव्हेंबरपर्यंत बरे वाटेल. पण मला रोजच्या कामात कोणतीही अडचण येत नाही", असे धोनीने सांगितले.
दरम्यान, चालू विश्वचषकातील आपले सुरूवातीचे पाचही सामने जिंकून टीम इंडियाने उपांत्य फेरीकडे कूच केली आहे. भारताचा आगामी सामना गतविजेत्या इंग्लंडसोबत होणार आहे. भारताच्या पाठोपाठ न्यूझीलंडचा संघ आठ गुणांसह क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे.