World Cup 2023, India vs Pakistan : वन डे विश्वचषक आता अंतिम टप्प्यात आला आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी चार संघ लढत आहेत, तर यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिकेने आधीच आपली जागा पक्की केली आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या विजयामुळे पाकिस्तानी संघाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आशा जिवंत झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान असा सामना पाहायला मिळू शकतो. अशातच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. अनेक क्रिकेट दिग्गजांनाही या संघांमधील उपांत्य फेरीच्या सामन्याची अपेक्षा आहे.
सौरव गांगुलीने सांगितले की, २०२३ च्या वन डे विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना भारत आणि पाकिस्तानमध्ये होऊ शकतो. कारण मला वाटते की, उरलेला एक सामना जिंकून उपांत्य फेरी गाठण्यात पाकिस्तानला यश येईल. गांगुली 'स्पोर्ट्स तक'शी बोलत होता. खरं तर उपांत्य फेरीतील पहिला सामना गुणतालिकेतील अव्वल आणि चौथ्या क्रमांकावरील संघ यांच्यात होईल. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाईल.
जाणून घ्या समीकरणभारतीय संघ आताच्या घडीला गुणतालिकेत अव्वल स्थानी असून साखळी फेरी पूर्ण होईपर्यंत टीम इंडियाचेच वर्चस्व राहील अशी आशा आहे. तर पाकिस्तानी संघ चौथ्या क्रमांकावर ग्रुप स्टेजचा प्रवास संपवू शकतो. अशा स्थितीत या दोन संघांमध्ये उपांत्य फेरीचा सामना होऊ शकतो. दोन्ही देशांच्या चाहत्यांनाही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याची अपेक्षा आहे. याआधी यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना झाला होता. भारताने मोठा विजय मिळवताना पाकिस्तानचा सात गडी राखून दारूण पराभव केला होता. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना १९१ धावांत गुंडाळले होते. त्यानंतर भारताने तीन गडी गमावून सहज लक्ष्य गाठले होते.