आयपीएल २०२३मध्ये ५४व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा विकेट्सनी पराभव करत यंदाच्या मोसमातील सहावा विजय मिळवला. या विजयासह मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत स्थान मिळवलं आहे. तर मुंबईकडील पराभवानंतर बंगळुरुचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याच मार्ग कठीण झाला आहे. सूर्यकुमार यादव आणि नेहल वधेरा या दोघांच्या स्फोटक शतकी भागीदारीच्या जोरावर मुंबईने यंदाच्या सत्रात तिसऱ्यांदा द्विशतकी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना आरसीबीला ६ गड्यांनी नमवले. आरसीबीने २० षटकांत ६ बाद १९९ धावा केल्यानंतर मुंबईने १६.३ षटकांत ४ बाद २०० धावा केल्या.
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना इशान किशनने मुंबईला वेगवान सुरुवात करुन देताना कर्णधार रोहित शर्मासह २८ चेंडूंत ५१ धावांची दमदार सलामी दिली; मात्र पाचव्या षटकात वानिंदू हसरंगाने दोघांनाही बाद केले. यानंतर सूर्यकुमार यादव-नेहाल वधेरा यांनी सामन्याचे चित्रच पालटताना ६६ चेंडूंत १४० धावांची तुफानी भागीदारी केली. १६व्या षटकात विजयकुमार व्यषकने सूर्याला झेलबाद केले, मात्र तोपर्यंत सामना आरसीबीच्या हातून निसटला होता. सूर्या आणि वधेरा यांचे अर्धशतक मुंबईच्या विजयात निर्णायक ठरले.
सूर्याच्या आक्रमक खेळीचं कौतुक जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटू करत आहे. सोशल मीडियावर देखील त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू सौरव गांगुली याने देखील सुर्याचं ट्विट करत कौतुक केलं आहे. सूर्यकुमार यादव जगातील सर्वोत्तम टी-ट्वेंटी खेळाडू आहे...तो एखाद्या कॉम्प्युटरवर फलंदाजी करतो असे दिसते, असं म्हणत सौरव गांगुलीने सुर्याचं कौतुक केलं आहे.
मुंबईच्या विजयानंतर प्लेऑफची शर्यत रंजक झाली आहे. प्लेऑफच्या शर्यतीत गुजरात सर्वात पुढे आहे. गुजरात टायटन्स संघ १६ गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. त्यानंतर चेन्नई १३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीचा पराभव करत मुंबईनं तिसरं स्थान काबीज केलं आहे. मुंबईच्या विजयाचा लखनौ आणि राजस्थानला धक्का बसला आहे. दोन्ही संघ एक-एक स्थान खाली घसरले आहेत. लखनौ आता ११ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर राजस्थान पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.