Arshdeep Singh Team India : भारताचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत पाच विकेट्स घेऊन प्रकाशझोतात आला होता. त्याच्या भेदक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेच्या बलाढ्य संघाला गुडघे टेकावे लागले होते. आतापर्यंत भारताच्या कोणत्याही गोलंदाजाला दक्षिण आफ्रिकेत वन डे क्रिकेटमध्ये पाच विकेट्स मिळवता आले नव्हते. पण अर्शदीपने ही किमया आपल्या चौथ्याच वन डे सामन्यात करून दाखवली. दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असलेल्या आफ्रिकेला अर्शदीप सिंगने मोठे धक्के दिले. यजमान संघाच्या कर्णधाराचा निर्णय चुकीचा होता हे अर्शदीपने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सिद्ध केले.
दरम्यान, अर्शदीप सिंगला अद्याप एकदाही कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही. अर्शदीप सिंगने २०२२ मध्ये ट्वेंटी-२० सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केले. आतापर्यंत त्याने ४२ ट्वेंटी-२० सामने खेळले असून ५९ खेळांडूंना गारद केले आहे. 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री यांनी अर्शदीप सिंगसाठी बॅटिंग केल्याचे दिसते. त्यांनी सांगितले की, अर्शदीप सिंगने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नावावर चांगल्या विक्रमाची नोंद आहे. अर्शदीपच्या कामगिरीचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी तोंडभरुन कौतुक केले. तसेच त्याला कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळायला हवी, अशी मागणी देखील केली.
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून तिथे कसोटी मालिका खेळवली जात आहे. भारताला दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर नेहमीच कसोटी क्रिकेटमध्ये संघर्ष करावा लागला आहे. आतापर्यंत एकदाही टीम इंडियाला आफ्रिकेला त्यांच्यात घरात जाऊन पराभूत करता आले नाही. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. यजमान संघाने सलामीचा सामना जिंकून ३२ वर्षांची परंपरा कायम ठेवली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, अभिमन्यू ईश्वरन, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.
Web Title: Former Indian cricket team coach Ravi Shastri has demanded that Arshdeep Singh be included in the Test team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.