आशिया चषक २०२३ स्पर्धे दरम्यान अक्षर पटेलला दुखापत झाली अन् भारतीय संघ व्यवस्थापनाने तातडीने वॉशिंग्टन सुदंरला श्रीलंकेत बोलावले अन् थेट फायनलच्या संघात स्थानही दिले. आशिया चषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने ऑफ स्पिनर आर अश्विन ( R Ashwin) याच्या संपर्कात असल्याचे सांगून तो वर्ल्ड कप स्पर्धेत खेळू शकतो असे संकेत दिले. पुढच्या दोन दिवसात अश्विनची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वन डे मालिकेत निवडही करण्यात आली. माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने अनुभवी ऑफस्पिनर अश्विनच्या वनडे संघातील पुनरागमनबाबत खुलासा केला. वर्ल्ड कप पूर्वी अश्विनचा भारतीय संघात समावेश, हा एक नवीन ट्रेंड बनला आहे यावर आकाश चोप्राने भर दिला.
अश्विनचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेल डाव्या क्वाड्रिसेप्सच्या ताणामुळे तीन सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर सुमारे २० महिन्यांनंतर ऑफ-स्पिनरला वन डे क्रिकेटमध्ये राष्ट्रीय संघात बोलावण्यात आले. आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, निवडकर्त्यांनी वर्ल्ड कप संघात ऑफ-स्पिनरची आवश्यकता ओळखली, ज्यामुळे अश्विन व वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश करण्यात आला.
“मजेची गोष्ट म्हणजे प्रत्येक वर्ल्ड कपपूर्वी असे घडते. गेल्या दोन-तीन वर्ल्ड कप स्पर्धांवर नजर टाकली तर, तो ट्वेंटी-२० असो वा वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतच्या एका वर्षासाठी निवडला जात नाही. वर्ल्ड कपपूर्वी भारतीय क्रिकेटला अचानक अश्विनची आठवण येते. संघात ऑफ-स्पिनरची उणीव भासत होती. वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या संघात ऑफस्पिनर नव्हता. अक्षराच्या दुखापतीमुळे, अचानक एक जागा रिक्त होते आणि त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरसह अश्विन देखील चित्रात आला आहे,” असे चोप्रा म्हणाला.
रविचंद्रन अश्विनचा ऑस्ट्रेलियात २०२१ च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताच्या संघात आश्चर्यचकितपणे समावेश करण्यात आला होता, तो या योजनेत नसतानाही. अश्विन या स्पर्धेनंतर वन डे क्रिकेट फार खेळला नव्हता. आता त्याला वॉशिंग्टनच्या आधी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळले, असे चोप्रा म्हणाला. “मला वाटतं मोहालीत सामना होईल तेव्हा अश्विन सुंदरच्या पुढे खेळेल. अर्थात, वॉशिंग्टन देखील खेळू शकतो, कारण संघात फक्त तीनच फिरकीपटू आहेत, रवींद्र जडेजा, अश्विन आणि सुंदर. मला वाटते अश्विन हा पहिला आणि सुंदर दुसरा फिरकी गोलंदाज असेल,” असा चोप्राने निष्कर्ष काढला.