Join us  

जामनगरचा नवीन 'राजा' अजय जडेजा; राजघराण्याचा पुढचा वारस ठरला, जाणून घ्या इतिहास

ajay jadeja jamnagar : अजय जडेजाच्या शिरपेचात मानाचा तुरा.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 2:24 PM

Open in App

ajay jadeja news : भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूच्या शिरपेचात मानाचा तुरा... गुजरातमधीलजामनगर राजघराण्याचा पुढील वारस म्हणून माजी क्रिकेटपटू अजय जडेजाची निवड करण्यात आली आहे. 'जाम साहेब' शत्रुशल्य सिंह महाराज यांनी शनिवारी सकाळी हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. जडेजाने याआधीच भारतीय क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. ट्वेंटी-२० विश्वचषकादरम्यान तो अफगाणिस्तान क्रिकेट संघाशी मेंटॉर म्हणून जोडला गेला होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली अफगाणिस्तानच्या संघाने चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

शत्रुशल्य सिंह महाराज यांनी एका निवेदनाद्वारे म्हटले की, पांडवांनी १४ वर्षांचा वनवास यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर विजयाचा अनुभव घेतला तो दिवस म्हणजे दसरा. आज मलाही विजयी झाल्यासारखे वाटत आहे, कारण अजय जडेजाने माझा उत्तराधिकारी आणि नवानगरचा पुढचा जाम साहेब होण्याचे मान्य केले आहे. जडेजाला मी खरोखरच खूप मोठा मानतो. तसेच ही जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांनी अजय जडेजाचे आभारही मानले.

दरम्यान, जामनगरच्या राजघराण्याचा इतिहास जडेजा घराण्यातील राजा जाम रावलशी जोडला आहे. १५४० मध्ये त्यांनी नवानगर राज्याची स्थापना केली. तसेच रंगमती आणि नागमती या दोन नद्यांच्या काठावर एक किल्ला आणि महालासह आशापुरा देवीचे मंदिर बांधले असल्याची माहिती आहे. ३६ प्रकारचे राजपूत कच्छहून जाम रावल यांच्यासह जामनगरला आले होते. जाम रावल हे जाम हलाचा यांचे वंशज होते. म्हणूनच या भागाला 'हालार' असे संबोधले जाते. स्थानिक भाषेत 'जाम' या शब्दाचा अर्थ 'सरदार' असा होतो. जाम साहेब ही पदवी सर्वप्रथम जाम रावलजी जडेजा यांनी वापरली होती. 

विशेष बाब म्हणजे जामनगरच्या राजघराण्याला क्रिकेटचा समृद्ध वारसा आहे. प्रतिष्ठित रणजी करंडक आणि दुलीप करंडक यांना अनुक्रमे अजय जडेजाचे नातेवाईक केएस रणजीतसिंहजी आणि केएस दुलीपसिंहजी यांचे नाव देण्यात आले आहे. याच कुटुंबातील अजय जडेजाने १९९२ ते २००० पर्यंत भारताचे प्रतिनिधित्व केले. 

टॅग्स :जामनगरगुजरातऑफ द फिल्ड