IPL 2023 Playoffs मध्ये आजपासून रंगतदार सामने खेळवले जाणार आहेत. पहिल्या सामन्यात गुजरात आणि चेन्नई (GT vs CSK) आमनेसामने आहेत. यापैकी विजेता संघ थेट फायनलमध्ये जाईल तर हरणाऱ्या संघाला आणखी एक सामना खेळण्याची संधी मिळेल. गुजरातच्या संघाने यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आज त्यांचे पारडे जड मानले जात आहे. पण त्यांचा कर्णधार हार्दिक पांड्या दुखापतीमुळे गोलंदाजी करू शकला नव्हता. अशा परिस्थितीत माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने हार्दिकला एक मोलाचा सल्ला दिला आहे. गुजरातच्या संघाने आज चेन्नई विरूद्ध खेळताना एक अतिरिक्त गोलंदाज खेळवावा असं त्याने सांगितले. इतकेच नव्हे तर तो खेळाडू कोणता असावा, हे नावदेखील त्याने सुचवले.
आजचा सामना चेपॉकच्या मैदानात आहे. गुजरातच्या संघाने त्यांच्या गेल्या तीन सामन्यात पाच गोलंदाज खेळवले. आणि हैदराबाद विरूद्ध खेळताना नूर अहमदच्या दुखापतीमुळे त्यांनी राहुल तेवातियाला गोलंदाजी करायला लावली. पण आता त्यांनी ही रिस्क घेऊ नये. गुजरात केवळ पाच गोलंदाज घेऊन मैदानात उतरत आहे, ही चांगली स्ट्रॅटेजी नाही. मुंबई विरूद्धच्या सामन्यात त्याचा त्यांना फटका बसला. आता हार्दिक दुखापतग्रस्त असताना तो गोलंदाजी करू शकणार नाही. अशा वेळी गुजरातने सहावा गोलंदाज संघात घ्यावा आणि तो गोलंदाज जयंत यादव असावा," असे आकाश चोप्रा म्हणाला.
मोहम्मद शमी सध्या दमदार गोलंदाजी करत आहे. यश दयालच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे तर तो ५०-५० प्रकारची गोलंदाजी करतोय. तो वेगवान गोलंदाजी करतो पण तो धावाही खूप देतो. मोहित शर्मासारख्या गोलंदाजाला तुम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत गोलंदाजीसाठी रोखून ठेवू शकत नाही. तो आधी चेन्नईच्या संघासोबत खेळला आहे त्यामुळे त्याला तेथील पिच नीट माहिती आहे. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त १०व्या षटकांपर्यंतच थांबवता येऊ शकते. राशिद खान आणि नूर अहमद हे दोघे प्रतिभावान स्पिनर्स आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात सहावा गोलंदाज खेळवायलाच हवा," असे आकाश चोप्राने स्पष्टपणे सांगितले.