नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान भाजपा खासदार गौतम गंभीर त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. क्रिकेट विश्वातील घडामोडींवर सातत्याने भाष्य करणारा गंभीर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन-उल-हक आणि विराट कोहलीचा आयपीएल २०२३ मध्ये वाद झाला होता. लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्या वादात लखनौच्या संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरने उडी घेतली होती.
खरं तर ज्या नवीन-उल-हकसोबत विराटचा वाद झाला होता त्याच अफगाणी खेळाडूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना गंभीरने एक सूचक कॅप्शन दिले. या कॅप्शनवरून चाहते गंभीरला लक्ष्य करत आहेत. गंभीरने नवीन-उल-हकसोबतचा फोटो शेअर करत म्हटले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा... तुझ्यासारखे खूप कमी आहेत, कधी बदलू नकोस."
नेमकं काय झालं होतं?
आरसीबी आणि लखनौ यांच्यातील सामन्यादरम्यान जेव्हा विराट कोहली आणि मोहम्मद सिराज नवीनच्या बॅटिंगवेळी त्याच्याशी बोलत होते तेव्हा अमित मिश्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण कोहली थांबला नाही आणि सतत काहीतरी सांगत राहिला. सामना संपल्यानंतर जेव्हा कोहली आणि नवीन समोरासमोर आले तेव्हा सुरुवातीला दोघांनी हस्तांदोलन केले. पण इथेही दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर नवीनने कोहलीचा हात झटकला. त्यानंतर गौतम गंभीरने वादात उडी घेत आपल्या संघातील खेळाडूचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.
नवीन-उल-हक अन् वाद नवीन-उल-हक त्याच्या तापट स्वभावासाठी ओळखला जातो. लंका प्रीमियर लीगदरम्यान पाकिस्तानच्या मोहम्मद आमिर आणि शाहिद आफ्रिदीसोबतही त्याचा वाद झाला होता. त्याच्या स्वभावाबद्दल नवीनने एकदा एका कार्यक्रमात म्हटले होते, "जर कोणी माझ्याकडे येऊन काही बोलले तर मी मागे हटणार नाही. मी लहानपणापासून असाच आहे. असा माझा स्वभाव आहे. उद्यापासून मी बदलेन असे म्हणत असेल तर मी खरे बोलत नसेन. मला कोणी काही बोलावे आणि मी माघार घेतो असे मी म्हटले तर ते कधीच होऊ शकत नाही. कारण आक्रमकता माझ्या शरीरात आहे, ती माझ्या डीएनएमध्ये आहे."