नवी दिल्ली: देशभरात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. आता तर देशात दिवसाला तीन लाख कोरोनाबाधित आढळून येत आहे. याचसह कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Variant) रुग्णही वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरातील नेतेमंडळी, कलाकार, क्रिकेटपटू यांना मोठ्या प्रमाणावर कोरोना होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते. हरभजन सिंगने स्वतः ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली.
माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. मी स्वतःला घरातच क्वारंटाइन करून घेतले असून, सर्व प्रकारची आवश्यक खबरदारी घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी शक्य तितक्या लवकर आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती सर्वांना करतो. सर्वांनी सुरक्षित राहा आणि काळजी घ्या, असे आवाहन करणारे ट्विट हरभजन सिंग याने केले आहे.
अलीकडेच क्रिकेटमधून घेतली निवृत्ती
भारताच्या सर्वांत यशस्वी फिरकी गोलंदाजांपैकी एक ऑफस्पिनर हरभजनसिंग याने अलीकडेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यामुळे दिग्गज खेळाडूची २३ वर्षांची कारकीर्द संपली. यानंतर हरभजन सिंग नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह राजकारणात नवीन इनिंग सुरू करण्याविषयी चर्चा रंगल्या होत्या. पंजाबच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरभजन सिंग राजकारणातील नवी इनिंग सुरू करू शकतात, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात होते.
दरम्यान, देशभरात आताच्या घडीला अनेकविध क्षेत्रातील दिग्गज, मान्यवरांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. देशभरात गेल्या २४ तासांत ३ लाख ४७ हजार २५४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ७०३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, गेल्या २४ तासात २ लाख ५१ हजार ७७७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय देशभरात ९ हजार ६९२ ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत.