भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) बुधवारी केंद्रीय करार जाहीर केले आणि त्यातून इशान किशन व श्रेयस अय्यर यांना वगळण्यात आले. या दोघांनी राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना देशांतर्गत क्रिकेटकडे पाठ फिरवल्यामुळे BCCI ने शिक्षा दिल्याची चर्चा सुरू आहे. पण, यावरून माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण ( Irfan Pathan ) याचे ट्विट पुन्हा एकदा व्हायरल झाले आहे.
BCCI ने नुकतेच २०२३-२४ सीझनसाठी करार जाहीर केले आणि इरफान पठाणला इशान-अय्यरच्या नाव नसल्याचे आश्चर्य वाटले. माजी अष्टपैलू खेळाडूने ट्विट केले आणि किशन व अय्यर दोघेही भारतीय संघात जोरदार पुनरागमन करतील, अशी आशा व्यक्त केली. BCCI स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याचे नाव कराराच्या यादीत नमूद केल्यानंतर नियम सर्वांसाठी कसे सारखेच असावेत असेही इरफान म्हणाला.
''श्रेयस आणि इशान दोघेही प्रतिभावान क्रिकेटपटू आहेत. आशा आहे की ते मजबूत पुनरागमन करतील. हार्दिक सारख्या खेळाडूंना लाल चेंडूचे ( पाच दिवसांचे) क्रिकेट खेळायचे नसेल, तर त्याने आणि त्याच्यासारख्या इतरांनी राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना पांढऱ्या चेंडूच्या ( मर्यादित षटकांच्या) देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घ्यावा का? जर हे सर्वांना लागू होत नसेल, तर भारतीय क्रिकेट अपेक्षित परिणाम साधू शकणार नाही!,''असे इरफानने ट्विट केले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी २०२३-२४ हंगामासाठी ( १ ऑक्टोबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ ) टीम इंडियाच्या वरिष्ठ संघासाठी वार्षिक खेळाडू करार जाहीर केले.
- A+ ग्रेड - रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा
- A ग्रेड - आर अश्विन, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, लोकेश राहुल, शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या.
- B ग्रेड - सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.
- C ग्रेड - रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दूल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसीद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.