बिजनौर - उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील मेकअप आर्टिस्ट फैयाज अंसारी याचा वेस्टइंडिजमध्ये स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये कमेंटेटर म्हणून सहभागी माजी भारतीय खेळाडू इरफान पठाण याच्यासोबत फैयाज वेस्ट इंडिजला गेला होता. फैयाजचा मृतदेह परत पाठवण्याचा खर्च इरफान पठाण यांनी केला आहे असं फैयाजच्या कुटुंबाने सांगितले. फैयाजच्या अचानक निधनानं कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फैयाज अंसारी हा मूळचा बिजनौरच्या नगीना तहसिलमधला काजी सराय येथे राहणारा होता. तो अनेक वर्षापासून मुंबईत मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होता. इथं फैयाजचं सलूनचं दुकान होतं. एकेदिवशी माजी क्रिकेटपटू इरफान पठाण फैयाजच्या सलूनवर गेला. त्यानंतर हळूहळू दोघांची चांगली ओळख झाली. फैयाजचं काम पाहून इरफाननं फैयाजला स्वत:चा मेकअप आर्टिस्ट बनवलं. इरफान फैयाजला त्याच्यासोबत परदेशातही घेऊन जात होता.
सध्या वेस्टइंडिज-अमेरिकेत टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. टूर्नामेंटमधील सुपर ८ मॅच वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणार आहेत. इरफान पठाण मॅचमध्ये कॉमेंट्री करण्यासाठी वेस्ट इंडिजला आहे. त्यामुळे इरफाननं फैयाजला मेकअप आर्टिस्ट म्हणून वेस्टइंडिजला नेले. शुक्रवारी संध्याकाळी फैयाजचा एका हॉटेलमध्ये स्विमिंग पूलमध्ये पोहताना बुडून मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबाला कळाली. फैयाजच्या अचानक मृत्यूने कुटुंबाला धक्का बसला असं फैयाज अंसारीचा भाऊ मोहम्मद अहमदनं सांगितले.
दरम्यान, २ महिन्यापूर्वीच फैयाजचं लग्न झालं होतं. ८ दिवसांपूर्वी तो बिजनौरहून मुंबईला गेला होता. त्यानंतर शुक्रवारी त्याच्या निधनाची बातमी आली. फैयाजच्या मृत्यूनं पत्नी आणि कुटुंब ढसाढसा रडत आहेत. इरफान पठाण स्वत: वेस्ट इंडिजमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून फैयाजचा मृतदेह भारतात पाठवण्याची तयारी करत आहे. फैयाजचा मृतदेह दिल्लीला पाठवला जाईल. या प्रक्रियेला ३-४ दिवस लागण्याची शक्यता आहे. मात्र फैयाजच्या मृत्यूनंतर गावात त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याचे कुटुंब दिल्लीला मृतदेह आणण्यासाठी जाणार आहेत.