नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मनोज प्रभाकर यांची नेपाळच्या संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नेपाळ क्रिकेट संघाने (CAN) सोमवारी माजी क्रिकेटर मनोज प्रभाकर (Manoj Prabhakar) यांची पुरूष राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड केली आहे. पुबुडू दसनायके (Pubudu Dassanayake) यांच्या जागेवर ऑलराउंडर खेळाडू मनोज यांची वर्णी लागली आहे. प्रभाकर यांनी तीन रणजी ट्रॉफीमध्ये प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली आहे. यापूर्वी त्यांनी अफगाणिस्तानचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.
मनोज प्रभाकर यांनी १६९ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. माजी भारतीय स्टार ऑलराउंडर आणि रणजी ट्रॉफी विजेते प्रशिक्षक प्रभाकर यांची नेपाळच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाकर यांनी भारतासाठी ३९ कसोटी आणि १३० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. प्रभाकर यांनी दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या क्रिकेट असोसिएशनच्या रणजी ट्रॉफी संघासह अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचे काम पाहिले आहे.
भारतीय खेळाडूचा विदेशात डंका
विशेष म्हणजे काठमांडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघर्ष करत असताना प्रभाकर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याआधी नेपाळ २०२२ आयसीसी पुरूष टी-२० विश्वचषकाच्या पात्रता सामन्याला मुकला होता. "नेपाळ क्रिकेटमध्ये असलेली क्रिकेटची आवड, त्यांची प्रतिभा आणि कौशल्य पाहता एक चांगला क्रिकेट संघ तयार करण्यासाठी नेपाळ क्रिकेट संघासोबत काम करण्यासाठी मी खरोखर उत्सुक आहे. मी नेपाळचे आभार मानत आहे. मला ही संधी दिल्याबद्दल क्रिकेट व्यवस्थापन आणि संपूर्ण असोसिएशनसह नेपाळच्या क्रिकेट चाहत्यांचे आभार", अशा शब्दांत मनोज प्रभाकर यांनी या निर्णयामुळे आपण खुश असल्याचे म्हटले आहे.