IPL Auction 2024 : आयपीएल म्हणजे जगातील सर्व क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच... जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग असलेली आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएल २०२४ ला सुरूवात होण्यासाठी आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. मंगळवारी दुबईत आयपीएलचा मिनी लिलाव पार पडला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बक्कळ कमाई करत इतिहास रचला. डावखुरा गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, तर पॅट कमिन्सने विक्रम रचत २०.५० कोटींचा गल्ला जमवला. लक्षणीय बाब म्हणजे मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीने तब्बल २४.७५ कोटी रूपयांमध्ये खरेदी केले.
पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांच्यावर विक्रमी बोली लागल्यानंतर भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने एक पोस्ट केली. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले, "आयपीएलमधील विजेत्या संघास २० कोटी रूपये मिळतात. पॅट कमिन्सला २०.५० कोटी मिळाले, तर मिचेल स्टार्कला २४.७५ कोटी मिळाले आहेत. 'दया कुछ तो गडबड है'."
दरम्यान, आयपीएल २०२४ साठी मंगळवारी दुबईत खेळाडूंचा लिलाव पार पडला. लिलावाच्या रिंगणात एकूण ३३३ खेळाडू होते, ज्यातील काहींना आयपीएल २०२४ चा भाग होण्याची संधी मिळाली. तर, काही खेळाडू जगातील लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगपासून दूर राहिले. आयपीएल २०२४ च्या मिनी लिलावात एकूण ५६ खेळाडूंची खरेदी झाली. ज्यामध्ये २३ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच १० फ्रँचायझींनी २,१२,६०,००,००० एवढी रक्कम खर्च केली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर ऐतिहासिक बोली लागली. खरं तर स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला असून, त्याला केकेआरच्या फ्रँचायझीने २४.७५ कोटीत आपल्या ताफ्यात घेतले.
मिचेल स्टार्कवर पैशांचा वर्षावऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क कोणत्या संघात जाणार याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले होते. स्टार्कसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मोठी चुरस झाली. यॉर्कर किंगला आपल्या संघाचा भाग बनवण्यासाठी दोन्हीही फ्रँचायझींनी मोठी रक्कम मोजण्याची तयारी दाखवली. दिल्लीने माघार घेतल्यानंतर केकेआरने यात उडी घेतली. मग गुजरात टायटन्सने देखील स्टार्कला खरेदी करण्यासाठी रस दाखवला. केकेआर आणि गुजरातच्या फ्रँचायझीने मोठी रक्कम मोजण्याची तयारी कायम ठेवली अन् १४ कोटींवर बोली गेली तरी स्टार्क लिलावाच्या रिंगणात कायम राहिला. आकडा २० कोटीवर गेला तरी बोली चालू होती. केकेआरने अखेर तब्बल २४.७५ कोटीत स्टार्कला आपल्या संघाचा भाग बनवले. यासह स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. २०१५ नंतर तब्बल आठ वर्षांनंतर स्टार्कचे जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगमध्ये पुनरागमन झाले आहे.