कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेनं क्रिकटपटूंच्या घरातही शिरकाव केलेला पाहायला मिळत आहे. चेतन सकारिया, पीयूष चावला यांनी कोरोनामुळे वडिलांना गमावले, तर आर अश्विनच्या घरच्या 10 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भारताचा माजी गोलंदाज आर पी सिंग (Former Cricketer RP Singh) याचे वडील शिवप्रसाद सिंग यांचे बुधवारी दुपारी कोरोनामुळे निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.
लखनौच्या मेदांत हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि आज दुपारी 12च्या सुमारास त्यांचे निधन झाले. शिव प्रसाद यांना कोरोना झाला होता आणि त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. वडिलांना कोरोना झाल्यामुळे आर पी सिंगनं आयपीएल 2021मधून समालोचकांच्या यादीतून आपले नाव मागे घेतले होते. वडिलांची काळजी घेण्यासाठी त्यानं हा निर्णय घेतला होता. 2018मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर समालोचक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला.
आर पी सिंगनं 14 कसोटीत 40 विकेट्स घेतल्या. त्याच्या नावावर 58 वन डे सामन्यांत 69 आणि 10 ट्वेंटी-20त 15 विकेटे्स आहेत. 2011मध्ये त्यानं अखेरचा वन डे सामना खेळला होता. 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं 12 विकेट्स घेतल्या होत्या.