Rohit Sharma Team India, IND vs SL 1st ODI: भारताने घरच्या मैदानावर श्रीलंकेविरूद्ध टी२० मालिका २-१ने जिंकली. आजपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील वन डे मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे खेळला जात आहे. मालिकेतील सलामीचा सामना बारसापारा स्टेडियमवर खेळवला जात असून या सामन्यासाठी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी२० मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल या तिघांना विश्रांती देण्यात आली होती. पण वन डे मालिकेत संघातील वरिष्ठ खेळाडूंनी पुनरागमन केले. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाला कठीण पण महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले. त्यावरून भारताचा माजी वेगवान गोलंदाज Venkatesh Prasad भलताच संतापल्याचे दिसून आले.
अलीकडेच पार पडलेल्या टी२० मालिकेत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांना विश्रांती देण्यात आली होती. त्यावेळी संघाचा उपकर्णधार असलेल्या सूर्यकुमार यादवने दमदार शतक ठोकले होते. पण त्याला वन डे मालिकेत विश्रांती देण्यात आली. वन डे मधील त्याचा फॉर्म हे चिंतेचे कारण असल्याचे सांगण्यात आले. पण त्यासोबतच इशान किशनलाही संघाबाहेर बसवण्यात आले. बांगलादेश विरूद्धच्या वन डे मालिकेत इशान किशनने द्विशतक ठोकले होते, पण त्याला संघाबाहेर करून, शुबमन गिलला संघात स्थान देण्यात आले. त्यावरून व्यंकटेश प्रसाद भडकला. त्याने ट्विटच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला.
"मला असं वाटतं की याआधी झालेल्या शेवटच्या वन डे सामन्यात ज्या खेळाडूने दमदार द्विशतक ठोकले असा इशान किशनला वन डे मालिकेत रोहितबरोबर सलामीला खेळण्याची संधी मिळायला हवी होती. बांगलादेश मध्ये भारतीय संघ पहिल्या दोनही वन डे हारला होता. अशा वेळी तिसऱ्या सामन्यात इशान किशनने द्विशतक ठोकले आणि टीम इंडियाची लाज राखली आणि त्यालाच तुम्ही संघातून बाहेर बसवत असाल तर योग्य नाही. शुबमन गिलला संधी देण्यासाठी त्याच्याकडे अख्खं आयुष्य पडलंय, पण द्विशतक ठोकणाऱ्या फलंदाजाला तुम्ही अशा पद्धतीने संघातून बाहेर करू शकत नाही," असं अतिशय रोखठोक मत व्यंकटेश प्रसादने व्यक्त केले.
दरम्यान, वन डे मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधीच यजमान संघाला जसप्रीत बुमराहच्या रूपात मोठा झटका बसला. बुमराह दुखातपीमुळे आगामी ३ सामन्यांच्या वन डे मालिकेतून बाहेर झाला आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या आगामी ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील त्याच्या समावेशावरूनही साशंकता आहे.
Web Title: Former Indian cricketer slammed Rohit Sharma Team India captain for dropping Ishan Kishan for Shubman Gill
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.