kl rahul asia cup 2023 | नवी दिल्ली : मोठ्या कालावधीनंतर लोकेश राहुलचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात दुखापत झाल्यानंतर राहुल क्रिकेटपासून दूर होता. सोमवारी भारतीय नियामक मंडळाने (BCCI) आशिया चषक २०२३ साठी टीम इंडियाची घोषणा केली. संघ जाहीर झाल्यानंतर भारताचे माजी खेळाडू आपापली मतं मांडत आहेत. अशातच भारताचा माजी खेळाडू व्यंकटेश प्रसादने बॉलिवूड अभिनेता आणि लोकेश राहुलचा सासरा सुनिल शेट्टीसोबतच्या भेटीची झलक शेअर केली आहे. खरं तर राहुलने सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसोबत लग्न केलं आहे.
प्रसादने सुनिल शेट्टीसोबत अमेरिकेतील न्यू जर्सी इथं स्वामीनारायण मंदिराला भेट दिली. आण्णासोबतच्या भेटीची झलक शेअर करताना प्रसादनं म्हटलं, "सर्व भारतवासियांच्या कल्याणासाठी आणि भारतीय संघाने विश्वचषकात चांगली कामगिरी करावी यासाठी प्रार्थना केली. तसेच लोकेश राहुलने मैदानातील सर्व कानाकोपऱ्यात चेंडू पोहचवावा, संघाने विश्वचषक जिंकावा आणि माझ्यासारख्या त्याच्या टीकाकारांना शांत करावं यासाठी गुप्तपणे प्रार्थना केली. सगळे आनंदात राहा." लक्षणीय बाब म्हणजे अनेकदा व्यंकटेश प्रसादनं खराब खेळीचा दाखला देत लोकेश राहुलवर सडकून टीका केली आहे.
३० ऑगस्टपासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे, तर १९ सप्टेंबरला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. या स्पर्धेनंतर ५ ऑक्टोबरपासून भारतात बहुचर्चित वन डे विश्वचषकाला सुरूवात होईल. कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आशिया चषकात २ सप्टेंबर तर विश्वचषकात १४ ऑक्टोबरला आमनेसामने असतील.
आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा,
राखीव खेळाडू - संजू सॅमसन
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - ३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल