विराट कोहली व रोहित शर्मा यांनी केव्हा निवृत्ती घ्यावी, हा प्रश्न काही दिवसांनी नक्की विचारला जाणार आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) याला जेव्हा हा प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्याने मोठं विधान केलं. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी युवीची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड केली गेली आहे. पण, या स्पर्धेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा केली गेलेली नाही आणि संभाव्य १५ खेळाडूंबाबतही युवीनं त्याचं मत मांडले आहे. यावेळी युवीने युवा खेळाडूंना संधी मिळायला हवी, यावर भर दिला.
“तुम्ही जसजसे मोठे होता, तसतसे लोक तुमच्या वयाबद्दल बोलू लागतात आणि ते तुमच्याबद्दल विसरून जातात. विराट कोहली व रोहित शर्मा हे लोक भारताचे महान खेळाडू आहेत आणि त्यांना पाहिजे तेव्हा त्यांना निवृत्ती घेण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे,” असे युवीने ICC ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. “मला T20 फॉरमॅटमध्ये अधिक तरुण खेळाडू पाहायला आवडतील, कारण त्यामुळे अनुभवी खेळाडूंवरील वन डे व कसोटी सामने खेळण्याचा भार कमी होतो. या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मला भारतीय संघात अनेक युवा खेळाडू संघात खेळताना आणि पुढच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ तयार होताना पाहायला आवडले,''असेही तो म्हणाला.
आगामी T20 वर्ल्ड कपसाठी युवराज सिंगची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. तो वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल आणि महान धावपटू उसेन बोल्ट यांच्यासोबत या स्पर्धेसाठी ॲम्बेसेडर म्हणून सहभागी झाला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जून महिन्यात सुरू होईल आणि अमेरिका व कॅरिबियन येथे सामने होतील.
पात्र ठरलेले २० संघ...अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा
गटवारी
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ
स्पर्धेचा फॉरमॅट...
- २० संघ
- प्रत्येकी ५ अशा चार गटांत विभागणी
- चारही गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ साठी पात्र
- सुपर ८मध्ये ४-४ अशा दोन गटांत संघांची विभागणी
- दोन्ही गटांतील प्रत्येकी अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत
- फायनल
Web Title: Former Indian cricketer Yuvraj Singh backs skipper Rohit Sharma and Virat Kohli to continue in T20Is until they deserve to retire
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.