नवी दिल्ली - भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगची ऐतिहासिक बॅट अंतराळात पाठवण्यात आली आहे. ही बॅट अंतराळात पाठवण्यात आलेली आतापर्यंतची जगातील पहिलीच बॅट ठरली आहे. युवराजने याच बॅटच्या सहाय्याने ढाका येथे 2003 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यात आपले पहिले शतक झळकावले होते.
अंतराळात पोहोचली युवराजची बॅट -गेल्या आठवड्यात आशियातील एनएफटी बाजार कोलेक्सियन आणि माजी भारतीय क्रिकेटरच्या सहकार्याने यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. कंपनीने युवराजचा एनएफटी जारी करण्यासाठी त्याच्यासोबत करार केला आहे. याशिवाय, युवराजची बॅट अंतराळात पाठवून व्हिडिओच्या माध्यमाने चाहत्यांना आकर्षित केले जाईल. कारण ही अंतराळात पाठवण्यात आलेली पहिलीच बॅट आहे. व्हिडिओ कोलेक्सियनच्या अधिकृत वेबसाइटवर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अपलोड केला जाईल.
अत्यंत खूश आहे युवी... -यासंदर्भात बोलताना युवराज म्हणाला, "मी कोलेक्सियनवर माझा पहिला एनएफटी अंतराळ प्रवास शेअर करण्यास उत्सुक आहे. अशा प्रकारच्या एका नव्या प्लॅटफॉर्मवर चाहत्यांशी कनेक्ट होणे रोमांचक आहे आणि माझ्या शतक झळकावलेल्या बॅटसह, आणखी काही अत्यंत मौल्यवान वस्तूही शेअर करण्यास उत्सूक आहे. मला नेहमीच माझ्या चाहत्यांजवळ राहायला आवडते आणि कोलेक्सियनसोबत करार करून मी खूश आहे, कारण मी आपल्या क्रिकेटच्या प्रवासादरम्यान मिळालेल्या या मौल्यवान वस्तू, ज्या लोकांनी मझ्यावर नेहमीच प्रेम केले आणि मला सातत्याने प्रोत्साहित केले त्यांच्यासोबत शेअर करू शकेल."