इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील मुंबई इंडियन्स शेवटचा साखळी सामना आज लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध घरच्या मैदानावर खेळणार आहे. MI साठी हे पर्व काही खास राहिलेले नाही. त्यांना १३ सामन्यांत केवळ ४ विजय मिळवता आले आणि आजचा विजय त्यांना गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर घेऊन जाणारा ठरू शकतो. हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) कर्णधार करण्याचा निर्णय आधीच फसला आणि त्यामुळे त्यांना चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. पण, आता मुंबईचे आव्हान संपले आहे आणि त्यांना पुढच्या पर्वासाठी तयारी करावी लागणार आहे.
हार्दिकच्या नेतृत्वावर अनेक माजी खेळाडूंनी सडकून टीका केली आहे आणि भारताचा माजी कर्णधार वीरेंद्र सेहवाग याने पुढील पर्वात मुंबईची फ्रँचायझी हार्दिकला करारमुक्त करेल असा दावा केला आहे. त्याचवेळी वीरूने माजी कर्णधार रोहित शर्मालाही फ्रँचायझी रिलीज करतील असे म्हटले आहे. त्याचवेळी त्याने फ्रँचायझी जसप्रीत बुमराह व सूर्यकुमार यादव या दोघांनाच संघात कायम राखलीत असा दावा केला आहे.
"मला एक गोष्ट सांगा. शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान हे एकाच चित्रपटात काम करूनही तो चित्रपट हिट होण्याची हमी देत नाही. होईल का? तुम्हाला परफॉर्म करावे लागेल, बरोबर? तुम्हाला चांगली स्क्रिप्ट हवी आहे. त्याचप्रमाणे या सर्व मोठ्या नावांनी एकत्रित येऊन चांगले काम करायला हवे. रोहित शर्माने एक शतक झळकावले आणि तो सामना हरला. त्या सामन्यात इतरांनी काय कामगिरी केली? इशान किशन संपूर्ण हंगाम खेळला, परंतु तो पॉवरप्लेपर्यंतच मर्यादित राहिला. जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव ही दोन नावे संघात कायम ठेवली जातील,” असे वीरेंद्र सेहवागने क्रिकबझला सांगितले.
सेहवागसह भारताचा माजी फलंदाज मनोज तिवारी यानेही मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापक सूर्यकुमार व बुमराह यांच्याकडे पुढील कर्णधार म्हणून पाहतील आणि रोहित शर्माला संघात कायम राखणार नाही, असे म्हटले. "मी बुमराह आणि सूर्यकुमार या दोन खेळाडूंकडे पाहत आहे, ज्यांना मुंबई इंडियन्सकडून कायम ठेवले जाईल. त्यांच्या पलीकडे कोणीही नाही आणि परदेशी खेळाडूही नाहीत. टीम डेव्हिडने अपेक्षित कामगिरी केली नाही. व्यवस्थापनाला माझा सल्ला असेल की त्यांनी फक्त सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह या दोघांना कायम ठेवा आणि एकाला कर्णधार बनवा," असे तिवारी म्हणाला.