gautam gambhir viral video | कँडी : आशिया चषकाचा थरार सुरू असताना भारताचा माजी खेळाडू आणि भाजपा खासदार गौतम गंभीरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओवरून चाहत्यांसह राजकीय विरोधक गंभीरवर टीका करत आहेत. कोहली-कोहलीच्या घोषणा दिल्यानंतर गंभीर संतापल्याचे पाहायला मिळाले. पण, २-३ पाकिस्तानी चाहत्यांनी भारताविरूद्ध घोषणा दिल्या म्हणून मी ती प्रतिक्रिया दिली असल्याचे स्पष्टीकरण माजी भारतीय खेळाडूने दिले. गंभीरने चाहत्यांच्या दिशेने अश्लील इशारे केल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गंभीरचा व्हिडीओ व्हायरल गौतम गंभीर मैदानातून समालोचन कक्षाकडे जात असताना चाहत्यांनी कोहली-कोहलीचे नारे दिले. दरम्यान, गंभीरला पाहताच प्रेक्षकांनी कोहली-कोहलीचा जयघोष सुरू केला. सुरुवातीला गंभीर बघतच राहिला पण नंतर प्रेक्षकांकडे बोट दाखवत तो पुढे गेला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गंभीरने केलेल्या कृत्यावरून चाहते संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
गंभीरचं स्पष्टीकरण भारताच्या माजी खेळाडूला ट्रोल केल्यानंतर त्याने स्पष्टीकरण दिले आहे. "सोशल मीडियावर जे दाखवले जाते त्यात तथ्य नाही कारण लोक त्यांना जे दाखवायचे ते दाखवतात. सत्य हे आहे की, जर कोणी भारतविरोधी घोषणा दिल्या आणि काश्मीरबद्दल बोलले तर कोणी हसून प्रतिक्रिया देणार नाही किंवा हसत निघून जाणार नाही. प्रतिक्रिया तर दिली जाणारच. तिथे २-३ पाकिस्तानी चाहते होते जे काश्मीरवरून भारतविरोधी घोषणा देत होते. देशाविरोधी कोणी घोषणा देत असेल तर मी हसत जाणार नाही, प्रतिक्रिया देणारच. त्यामुळे ते माझे स्वाभाविक होते. मला माझ्या देशाविरुद्ध काहीही ऐकू येत नाही. त्यामुळे माझी ती प्रतिक्रिया होती", असे गंभीरने म्हटले.