भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान खासदार गौतम गंभीर नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतो. तापट स्वभावासाठी ओळखला जाणारा गंभीर अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याला कोणताच अपवाद नसून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून आयपीएलपर्यंत चाहत्यांना गंभीरचा रूद्रावतार दिसला आहे. मागील आयपीएल हंगामात देखील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यानंतर याची झलक पाहायला मिळाली होती. तेव्हा नवीन-उल-हक आणि विराट कोहलीच्या वादात उडी घेत गंभीरने किंग कोहलीविरोधात आवाज उठवला होता. मात्र, आता गौतम गंभीरने एक मोठे विधान केले असून विराट आणि माझ्यात फक्त मैदानात लढाई होते, असे त्याने म्हटले आहे.
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. अलीकडेच वन डे मालिका पार पडली, ज्यात पाहुण्या टीम इंडियाने २-१ ने विजय मिळवला. अखेरच्या सामन्याला सुरूवात होण्यापूर्वी विश्लेषण करत असलेल्या गंभीरला त्याच्या सहकाऱ्यांनी काही प्रश्न विचारले. वन डे विश्वचषकातील भारताची कामगिरी, यंदा पदार्पण करणारे खेळाडू, भारतीय संघाचे यंदा किती खेळाडूंनी कर्णधारपद भूषवले, सर्वाधिक धावा करणारा शिलेदार अशा प्रश्नांची मालिका सुरू होती. अशातच समालोचकांनी गंभीरला विराट कोहलीबद्दल प्रश्न विचारला, ज्याला गंभीरनेही मनमोकळेपणाने उत्तर दिले.
गंभीरची मिश्किल टिप्पणी अन्... प्रश्न होता की, विराट कोहलीने त्याचे ५०वे शतक कोणत्या गोलंदाजाच्या षटकात पूर्ण केले? याला उत्तर देताना गंभीरने म्हटले, "लॉकी फर्ग्युसन, आमचे जे काही आहे, ते फक्त मैदानावर आहे. आमची लढाई केवळ फिल्डवर असते, मैदानाबाहेर काहीही नाही." गंभीरने मिश्किलपणे असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
वन डे मालिकेत भारताचा विजयट्वेंटी-२० मालिका १-१ अशा बरोबरीत संपल्यानंतर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत २-१ ने वन डे मालिका जिंकली. विजयी सलामी देऊन भारतीय संघाने आघाडी घेतली होती, मात्र दुसरा सामना जिंकून यजमानांनी बरोबरी साधली. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक होता. पण, अखेरच्या सामन्यात मोठा विजय मिळवून टीम इंडियाने मालिका खिशात घातली.