नवी दिल्ली : श्रीलंकेकडून पराभव होताच पाकिस्तानी संघ आशिया चषकातून बाहेर झाला आहे. 'आशियाई किंग्ज' श्रीलंकेने सांघिक खेळी करत बाबर आझमच्या संघाचे आव्हान संपुष्टात आणले. त्यामुळे रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना खेळवला जाईल. पावसाच्या कारणास्तव सामना उशीरा सुरू झाल्याने ४२ षटकांची लढत झाली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेने दोन गडी राखून विजय साकारला. शेजाऱ्यांच्या पराभवानंतर त्यांच्यावर टीका होत असतानाच भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणने बोचरी टीका केली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर ४ चा सामना झाला तेव्हा टीम इंडियाने एकतर्फी विजय साकारला होता. याचाच दाखला देत इरफान पठाणने पाकिस्तानला डिवचले. पठाणने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "श्रीलंकेविरूद्ध अंतिम सामना खेळणे ही बाब भारतीय संघासाठी चांगलीच आहे. कारण आता भारताचा सामना एकतर्फी होणार नाही." एकूणच श्रीलंकेचा संघ पाकिस्तानपेक्षा अधिक चांगला असल्याचे पठाणने सांगितले.
पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात काल झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित ४२ षटकांत ७ बाद २५२ धावा केल्या होत्या. तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून कुसल मेंडिस (९१), चरिथ असलंका नाबाद (४९) आणि सदीरा समरविक्रम (४८) या त्रिकुटाने अप्रतिम कामगिरी केली. शेवटच्या काही षटकांमध्ये शाहीन आफ्रिदी आणि इफ्तिखार अहमद यांनी गोलंदाजीत कमाल केली अन् सामना पाकिस्तानकडे फिरवला. पण, अखेरच्या दोन चेंडूवर सहा धावांची गरज असताना झमान खानच्या षटकातील पाचव्या चेंडूवर चौकार गेला. मग अखेरच्या एका चेंडूत दोन धावांची आवश्यकता होती. असलंकाने अखेरचा चेंडू लेग साइडला टोलवून दोन धावांच्या मदतीने आपल्या संघाला फायनलचे तिकिट मिळवून दिले.
पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने ७३ चेंडूत ८६ धावांची नाबाद खेळी करून श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर उभारला. त्याच्याशिवाय अब्दुला शफीक (५२) आणि इफ्तिखार अहमद (४७) यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. खरं तर हारिस रौफ आणि नसीम शाह यांच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या पाकिस्तानला निसटता पराभव स्वीकारावा लागला.