भारतीय संघाचा माजी मराठमोळा खेळाडू केदार जाधव त्याच्या फलंदाजीच्या अनोख्या शैलीमुळे चर्चेत असायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला केदार आता लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळत आहे. इथे तो पुन्हा एकदा त्याच्या गोलंदाजीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. श्रीलंकेचा दिग्गज लसिथ मलिंगाच्या शैलीत केदार फिरकीपटू म्हणून गोलंदाजी करतो. लीजेंड्स लीग क्रिकेटच्या बाराव्या सामन्यात केदारने भन्नाट गोलंदाजी करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला.
केदार जाधव लीजेंड्स लीग २०२४ मधील दक्षिण सुपर स्टार्सच्या संघाचा भाग आहे. त्यांच्या संघाचा सामना सुरतमध्ये कोणार्क सूर्या ओडिशाशी झाला. या सामन्यात केदारच्या संघाने ८ गडी राखून विजय साकारला. प्रथम फलंदाजी करताना सदर्न सुपर स्टार्सने निर्धारित २० षटकांत ९ बाद १९२ धावा केल्या, प्रत्युत्तरात केदार जाधवच्या दक्षिण सुपर स्टार्सच्या संघाने १६ षटकांत २ गडी गमावून सामना जिंकला.
दरम्यान, केदार जाधवने आपल्या संघासाठी डावातील १३वे षटक टाकले, ज्यामध्ये त्याने केवळ सात धावा दिल्या. समोर इरफान पठाण आणि युसूफ पठाण ही जोडी होती, पण केदारने या दोन्ही दिग्गजांना शांत ठेवले. यादरम्यान लसिथ मलिंगाप्रमाणे त्याने युसूफला एक चेंडू टाकला, त्यावर पठाणला केवळ एकच धाव घेता आली. खरे तर केदारची बॉलिंग ॲक्शन खूपच विचित्र होती. तो खूप खाली वाकून आणि बाजूने हात आणून चेंडू टाकत असे, त्यामुळे चेंडूला उसळी न मिळाल्याने चेंडू खूप खाली राहत अन् फलंदाज बाद व्हायचे.
केदार जाधव २०१४ ते २०२० या कालावधीत भारताकडून वन डे आणि कसोटी खेळला. ७३ वन डे सामन्यांमध्ये त्याच्या नावावर १३८९ धावा आणि २७ बळींची नोंद आहे. ९ ट्वेंटी-२० सामन्यांत त्याने १२२ धावा केल्या आहेत. या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.