Join us  

"सूर्या 12 वेळा शून्यावर बाद झाला तरी चालेल...", भारतीय दिग्गजानं केलं मुंबईच्या पठ्ठ्याचं समर्थन

mumbai indians team 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडू सूर्यकुमार यादवचा दबदबा कायम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 6:31 PM

Open in App

suryakumar yadav mi । मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकत्याच जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडू सूर्यकुमार यादवचा दबदबा कायम आहे. पण ट्वेंटी-२० मधील नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये धावा करण्यासाठी संघर्ष करत आहे. मैदानाच्या चारही दिशांना मोठे फटकार मारून चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या सूर्याची बॅट आताच्या घडीला शांत आहे. आयपीएलच्या (IPL 2023) यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ३ सामने खेळले असून यामध्ये सूर्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. 

मुंबई इंडियन्सने खेळलेल्या ३ सामन्यांमध्ये सूर्याने १५, १ आणि ० धावांची खेळी केली. तिन्ही डावातील धावसंख्या मिळूनही त्याने वीसचा आकडा गाठला नाही. त्यामुळे त्याच्या खेळीवर विविध स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू मौहम्मद कैफने सूर्यकुमार यादवच्या समर्थनार्थ एक विधान केले आहे. सूर्या १२ वेळा जरी शून्यावर बाद झाला तरी फरक पडत नसल्याचे कैफने म्हटले आहे.

भारतीय दिग्गजानं केलं मुंबईच्या पठ्ठ्याचं समर्थन "सूर्यकुमार यादव जरी १२ वेळा शून्यावर बाद झाला तरी देखील काही फरक पडणार नाही. तो ज्याप्रकारचा खेळाडू आहे ते पाहता त्याला देखील संधी दिली जाऊ शकते. त्याने इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये जे काही केले आहे ते पाहून कोणत्याही गोलंदाजाला नक्कीच भीती वाटेल. त्यामुळे ४ वेळा शून्यावर बाद होणे हे काहीच नाही", असे मोहम्मद कैफने स्पोर्ट्सकीडाशी बोलताना म्हटले. 

मुंबई इंडियन्सला आपल्या सुरूवातीच्या ३ सामन्यांमध्ये केवळ एका सामन्यात विजय मिळाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्या घरात पराभव करून मुंबईने विजयाचे खाते उघडले. आताच्या घडीला मुंबईचा संघ गुणतालिकेत २ गुणांसह नवव्या स्थानावर स्थित आहे. उद्या कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध मुंबई आपला चौथा सामना खेळेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्ससूर्यकुमार अशोक यादवभारतीय क्रिकेट संघटी-20 क्रिकेट
Open in App