Sunil gavaskar on IPL । नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत भारतीय संघाच्या पराभवावर माजी सलामीवीर सुनील गावस्कर यांनी मोठे विधान केले आहे. टीम इंडियाने या मालिकेतील पराभव विसरू नये, असे त्यांनी म्हटले आहे. गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार, आयपीएल सुरू होत आहे, त्यामुळे भारतीय संघ हा पराभव विसरेल पण असे होता कामा नये.
दरम्यान, चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 21 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 49 षटकांत 269 धावा केल्या, प्रत्युत्तरात भारतीय संघ 49.1 षटकांत केवळ 248 धावांत आटोपला आणि सामना गमावला. यासोबतच भारताने ही मालिका देखील गमावली. ऑस्ट्रेलियासाठी फिरकीपटूंनी आपला करिश्मा दाखवला. ॲडम झाम्पाने सर्वाधिक 4 आणि ॲश्टन अगरने 2 बळी घेतले. या सामन्यात भारतीय फलंदाजांना फिरकीसमोर अडचणींचा सामना करावा लागला तर दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय डाव कोलमडला होता.
भारतीय संघाने हा पराभव लक्षात ठेवावा - गावस्करभारतीय संघ पराभवाला लगेच विसरून जातो पण असे व्हायला नको असे गावस्करांनी म्हटले आहे. स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना त्यांनी म्हटले, "ऑस्ट्रेलियाने भारतावर खूप दबाव बनवला. भारतीय संघाला सिंगल मिळवणे देखील कठीण होते. असे असताना तुम्हाला काहीतरी वेगळे करण्याची गरज असते. आता आयपीएलला सुरूवात होत आहे त्यामुळे यात रमून जाऊन हा पराभव विसरता कामा नये. भारतीय संघ कधी कधी तीच चूक करतो आणि गोष्टी विसरतो. मात्र, यावेळी तसे होऊ नये कारण विश्वचषकात आपल्याला पुन्हा ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागू शकतो."
ऑस्ट्रेलियाने जिंकली मालिका3 सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना जिंकून यजमान भारतीय संघाने विजयी सलामी दिली होती. पण दुसऱ्या सामन्यात भारताचा दारूण पराभव करून कांगारूच्या संघाने 1-1 ने मालिकेत बरोबरी साधली. काल झालेल्या अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी विजय मिळवून मालिका खिशात घातली. भारतीय फलंदाजांना आलेले अपयश भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"