नवी दिल्ली : वन डे विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना म्हणजे तमाम भारतीयांसाठी एक वाईट स्वप्नच... याच दिवशी ऑस्ट्रेलियानं तमाम भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा करत विश्वषक उंचावला. सलग दहा सामने जिंकून भारतीय संघानं अंतिम फेरी गाठली होती. मात्र बलाढ्य ऑस्ट्रेलियानं यजमानांना पराभवाची धूळ चारून सर्वाधिकवेळा (सहाव्यांदा) विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. कांगारूंनी भारताच्या तोंडचा घास पळवल्यानं चाहत्यांसह खेळाडूंनाही अश्रू अनावर झाले. भारतात क्रिकेट म्हणजे जणू काही धर्मच... या धर्माचे कोट्यवधी भक्त असून भारताने विश्वचषक गमावताच अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकच सन्नाटा पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियानं स्पर्धा जिंकून भारतीयांच्या हृदयावर घाव केला. याबद्दल विविक्ष क्षेत्रातील दिग्गजांनी भाष्य केले. पण, भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भारतीय चाहत्यांना धीर देताना एक मोठं विधान केलं.
कपिल देव यांनी सांगितलं की, एवढ्याही अपेक्षा ठेवू नका की तुमचं हृदय तुटेल. समतोल राखणं महत्त्वाचं आहे. विश्वचषक खेळण्यासाठी इतर संघही भारतात आले होते. पण भारतीय संघावर सर्वांचा फोकस होता. खेळाला खेळ मानायला हवं. सामन्याच्या दिवशी जो चांगला खेळतो त्याचा आदर करा. आपण भारतीय खूप भावूक होतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ नोव्हेंबर रोजी खचाखच भरलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर किताबासाठी सामना पार पडला. टीव्हीवरील प्रेक्षक संख्येनं अनेक विक्रम मोडले. विविध क्षेत्रातील दिग्गजांनी देखील ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी स्टेडियमवर हजेरी लावली होती.
तसेच आताचे खेळाडू किती दबावात असतात हे तेच चांगलं सांगू शकतील... मी केवळ अनुभवाच्या जोरावर हे सांगू शकतो. जिंकल्यानंतर देखील काही गोष्टींमध्ये चुका आढळतात. त्यामुळे त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. भारतानं सलग दहा सामने जिंकले ही मोठी बाब आहे. इतर संघांकडे देखील पाहायला हवं... आपण खूप चांगले क्रिकेट खेळलो, केवळ अंतिम सामना गमावला. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या संघांकडे पाहा. इंग्लंडचा संघ तर गतविजेता संघ असून सातव्या स्थानावर राहिला, असेही कपिल देव यांनी नमूद केलं.
ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला
१९ नोव्हेंबर २०२३ या दिवशी वन डे विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला गेला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाला शुबमन गिलच्या (४) रूपात मोठा झटका बसला. त्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (४७) आणि विराट कोहली (५४) यांनी डाव सावरला. पण ग्लेन मॅक्सवेलच्या षटकांत चुकीचा फटका मारून रोहित बाद झाला. ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेऊन हिटमॅनला बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे विराट सावध खेळी करून भारताचा डाव पुढे नेत होता. अशातच ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने यजमानांना आणखी एक धक्का देत श्रेयस अय्यरला तंबूत पाठवले. मग विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या अन् भागीदारी नोंदवली. निर्धाव चेंडूमुळे दबाव वाढत गेल्याने भारत अडचणीत सापडला. त्यात विराटला नशिबाची साथ न मिळाल्याने बाहेर जावे लागले. विराटने (५४) आणि राहुलने (६६) धावा करून ऑस्ट्रेलियासमोर सन्माजनक आव्हान उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. अखेर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. २४१ धावांचा पाठलाग करताना कांगारूंनी ट्रॅव्हिस हेडच्या (१३७) शतकी खेळीच्या जोरावर मोठा विजय मिळवला.
Web Title: former indian skipper Kapil Dev said, Don't keep so much hopes that people end up with broken hearts on India's WC campaign 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.