Indian Cricket: क्रिकेट जगतात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी आपला देश सोडून इतर देशांकडून क्रिकेट खेळले आहे. अनेक भारतीय खेळाडूंचाही यात समावेश आहे. अनेक भारतीय वंशाचे खेळाडू आजही परदेशी संघात खेळत आहेत. अनेक खेळाडूंनी दोन देशांसाठीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. पण आता एक वेगळी गोष्ट घडताना दिसणार आहे. जो खेळाडू स्वतः 'टीम इंडिया'कडून खेळला आहे, पण त्याचा मुलगा मात्र इंग्लंडच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. या खेळाडूची अंडर-19 संघातही निवड झाली आहे.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगचा (R P Singh) मुलगा हॅरी सिंग आता इंग्लंडकडून क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आरपी सिंगचा मुलगा हॅरी सिंग याची इंग्लंडच्या अंडर-19 संघात निवड झाली आहे. हॅरी सिंगला श्रीलंके विरूद्धच्या अंडर-19 मालिकेसाठी खेळण्यासाठी संधी इंग्लंडच्या अंडर-19 संघाकडून मिळाली आहे.
रुद्र प्रताप सिंग भारतासाठी प्रदीर्घ काळ सामने खेळू शकला नाही. मूळचा लखनौचा असलेला आरपी सिंग भारतासाठी टी२० विश्वचषक विजेत्या संघात होता. आरपी सिंग 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात इंग्लंडला गेला आणि लँकेशायर काउंटी क्लब आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) सोबत कोचिंग असाइनमेंट स्वीकारले. आरपी सिंगने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्यांना इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून फोन आला की त्याच्या मुलाची इंग्लंड अंडर-19 संघात निवड झाली आहे. हॅरी सिंग वयाच्या आठव्या वर्षी क्रिकेट खेळू लागला. इंग्लंडमध्ये शिकत असतानाच त्यांची क्रिकेटमधील आवड वाढली. आरपी सिंगच्या लेकीने इंग्लंडमध्ये लँकेशायरच्या अंडर-19 संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, परंतु नंतर शिक्षणासाठी तिने क्रिकेट सोडले.