भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर नेहमी त्याच्या विधानामुळे चर्चेत असतो. अलीकडेच पार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाच्या पराभवानंतर अनेक माजी खेळाडूंनी रोहितसेनेवर सडकून टीका केली होती. टीका करणाऱ्यांमध्ये गंभीरचा देखील समावेश होता. अशातच गंभीरने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या खेळाडूंवर टीकास्त्र सोडले. दरम्यान, पैसे कमावण्यासाठी इतर देखील मार्ग आहेत, पण त्यासाठी पान मसाल्याची जाहिरात करण्याची गरज नाही असे गौतम गंभीरने म्हटले होते.
खरं तर आयपीएलच्या यंदाच्या हंगामानंतर माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर, वीरेंद्र सेहवाग आणि कपिल देव यांनी काम केलेली पान मसाल्याची जाहिरात चांगलीच चर्चेत होती. याचाच दाखला देत गंभीरने नाव न घेता या खेळाडूंवर टीका केली होती. तसेच आपले आदर्श कोण हे निवडताना आपण काळजी घेतली पाहिजे, असेही गंभीरने म्हटले होते. लक्षणीय बाब म्हणजे गंभीरच्या या विधानानंतर त्याला सोशल मीडियावरट्रोल केले जात आहे. नेटकरी त्याच्या जुन्या जाहिरातीचा दाखला देत माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान खासदार गौतम गंभीरला लक्ष्य करत आहेत.
गंभीर जुन्या जाहिरातीवरून ट्रोलगंभीरने माजी खेळाडूंना जाहीरातीवरून ट्रोल केल्यानंतर त्याचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, गंभीर त्याच्या वडिलांचा दाखला देत आपण आयुष्यात काही मोठे केले आहे की नाही याबद्दल स्वत:ला प्रश्न विचारत असल्याचे सांगतो. ही जाहिरात एका मद्यविक्री कंपनीची आहे. यावरून गंभीरला नेटकरी ट्रोल करत आहेत.
WTC फायनलनंतर गंभीरचा टीम इंडियावर निशाणा ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर गौतम गंभीरने भारतीय संघावर टीका करताना म्हटले, मला वाटते की अनेक लोक हे बोलणार नाहीत, पण हे सत्य आहे आणि जगासमोर यायला हवे. आपल्या देशाला संघाची नाही, तर संघातील मोठ्या खेळाडूंची पूजा केली जाते. आम्ही खेळाडूला संघापेक्षा मोठा मानतो. इंग्लंड, न्यूझीलंड आणि इतर देशांमध्ये संघ मोठा आहे, एक खेळाडू नाही. हेच कारण आहे की आम्ही दीर्घकाळ आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलो नाही, कारण आम्हाला संघापेक्षा एका खेळाडूचे वेड आहे.''