Gautam Gambhir On Virat Kohli : भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान भाजपा खासदार गौतम गंभीर नेहमी त्याच्या विधानांमुळे चर्चेत असतो. सध्या सुरू असलेल्या वन डे विश्वचषकात गंभीर समालोचकाच्या भूमिकेत आहे. अशातच गंभीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो प्रसारकांवर नाराज असल्याचे दिसते. गौतम गंभीर व्हिडीओमध्ये म्हणतो की, अर्धशतक कोणीही केले तरी प्रसारक केवळ मलाच दाखवत असतील तर सगळ्यांना वाटेल की मीच स्टार आहे. अशा परिस्थितीत दुसरा खेळाडू अंडररेट होतो. एकूणच गंभीरने नाव न घेता विराट कोहलीला लक्ष्य केले.
तसेच प्रसारकांनी केवळ एकाच खेळाडूला सतत दाखवल्याने इतर खेळाडू अंडररेट होतात. प्रसारक आणि तज्ञ खेळाडूंना अंडररेट करण्यासाठी काम करतात का? हा देखील प्रश्न आहे. आपला संघ मोठ्या कालावधीपासून ICC स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरला आहे, परंतु आमचे खेळाडू संघ म्हणून नव्हे तर वैयक्तिकरित्या चांगली कामगिरी करत आहेत, असेही गंभीरने सांगितले. गौतम गंभीरने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गौतम गंभीर म्हणाला की, विराट कोहली चमकदार कामगिरी करत आहे यात शंका नाही, पण इतर खेळाडूंनीही संघाच्या विजयात योगदान दिले आहे. भारतीय संघाने साखळी फेरीतील आपले सर्व नऊ सामने जिंकले आहेत, ज्यामध्ये रोहित शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांसारख्या खेळाडूंनी देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले. पण, प्रसारक या खेळाडूंवर कमी लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, भारतीय संघाने विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. आपल्या अखेरच्या सामन्यात नेदरलँड्सविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ गडी गमावून ४१० धावांची विशाल धावसंख्या उभारली. श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी शतकी खेळी करून भारताच्या नवव्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अय्यरने नाबाद १२८ धावा केल्या तर राहुलने १०२ धावांचे योगदान दिले. ४११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ २५० धावांत आटोपला. स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वातील नेदरलँड्सला यंदाच्या विश्वचषकात ९ सामन्यांमध्ये २ विजय मिळवता आले. पण, नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारून क्रिकेट विश्वाला धक्का दिला. त्यांनी आफ्रिकेला ३८ तर बांगलादेशला ८७ धावांनी पराभूत केले.
Web Title: Former Indian team player Gautam Gambhir has said that broadcasters only focus on Virat Kohli so other players are underrated
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.