sachin tendulkar । मुंबई: भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू भारतरत्न सचिन तेंडुलकरला आपल्या साध्यापणामुळे देखील ओळखले जाते. क्रिकेटच्या विश्वावर राज्य करणारा सचिन त्याच्या साधेपणामुळे नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधत असतो. आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या देवाच्या कृतीमुळे याचा प्रत्यय आला आहे. सचिनने या हंगामातील पहिल्या आंब्याचा आस्वाद त्याच्या आईसोबत घेतला, ज्याचा व्हिडीओ खुद्द सचिनने शेअर केला आहे. आई आणि मुलाचं नातं किती गोड असतं हे या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे.
सचिन मराठी सणांसह त्याच्या आयुष्यातील घडामोडींचे फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा जरी जगविख्यात फलंदाज असला तरी तो मराठी सणांचा नेहमीच आदर करतो आणि आपल्या घरी उत्साहात सण-उत्सव साजरे करतो. अलीकडेच सचिनने पत्नी अंजलीसोबत गुढीपाडवा साजरा केला होता. आता सचिनने आईसोबत आंब्याचा आस्वाद घेतानाचा व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
दरम्यान, सचिन मागील काही दिवसांपासून वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत आहे. सचिन तेंडुलकरने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाबाबत महत्वाचे विधान केले. सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष आणि याआधीचे अध्यक्ष देखील माजी क्रिकेटपटू होते. मग भविष्यात तू बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पाहायला मिळणार आहेस का? असे सचिनला विचारण्यात आले असता त्याने अगदी मजेशीर उत्तर दिले. "मी वेगवान गोलंदाजी करत नाही", असे सचिन म्हणाला. (रॉजर बिन्नी आणि सौरव गांगुली मध्यम गतीने गोलंदाजी करायचे) एका दौऱ्यात जेव्हा गांगुलीने विकेट्स घेतल्या होत्या तेव्हा तो 140kmph गतीने गोलंदाजी करण्याचे बोलत होता. पण त्यानंतर त्याची कंबर दुखायला लागली होती. सचिनने याच मुद्द्यावर भाष्य करत मी 140 च्या गतीने गोलंदाजी करू शकत नाही असे मिश्किलपणे म्हटले आणि बीसीसीआय अध्यक्षपदाच्या प्रश्नाला टाळले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"