नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. केंद्र सरकारने लोकसभेत मंगळवारी हे विधेयक मांडलं. आज या विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू असून विविध पक्षातील नेते मंडळी आपापली मतं मांडत आहेत. काही विरोधकांचा अपवाद वगळता अनेकांनी यावरून सरकारचे अभिनंदन केले. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी यावर आपापली मतं व्यक्त करत आहेत. अशातच क्रीडा क्षेत्रातील नामवंत महिला खेळाडूंनी देखील या विधेयकाचे स्वागत करताना सरकारचे अभिनंदन केले. भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने महिलांच्या राजकारणातील सहभागावर प्रकाश टाकला. मिताली राजने म्हटले की, आपल्या सर्वांना माहित आहे की नोंदणीकृत मतदारांपैकी निम्म्या मतदार महिला आहेत. आता ३३% आरक्षणामुळे महिलांचा राजकारणातील सहभाग वाढणार आहे. हे एक उत्तम पाऊल आहे. महिला आरक्षण विधेयकाबद्दल मी पंतप्रधान आणि सरकारचे अभिनंदन करते.
याशिवाय बॉक्सर आणि माजी राज्यसभा खासदार मेरी कोम हिने देखील या विधेयकावरून मोदी सरकारचे अभिनंदन केले. "हे विधेयक मंजूर होणार आहे. नामवंत खेळाडूंना बोलावण्यात आल्याने आम्हाला आनंद झाला. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला आरक्षण खूप महत्त्वाचे आहे", अशा शब्दांत मेरी कॉमने आपल्या भावना व्यक्त केल्या.
महिला आरक्षण विधेयक काय आहे?महिला आरक्षण विधेयक एक घटनादुरुस्ती विधेयक आहे, जे भारतातील लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३% आरक्षणाची तरतूद करते. हे विधेयक १९९६ मध्ये पहिल्यांदा मांडण्यात आले होते, मात्र ते आजतागायत मंजूर झालेले नाही. भारतीय राजकारणात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे, हा महिला आरक्षण विधेयकाचा उद्देश आहे. भारतात २०२३ मध्ये लोकसभेतील महिलांचा सहभाग केवळ १४.५% आहे, जो जगातील सर्वात कमी आहे. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यामुळे महिलांचे प्रतिनिधित्व वाढेल आणि त्या धोरणनिर्मितीत अधिक प्रभावी भूमिका बजावू शकतील, अशी अपेक्षा आहे.