नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत देखील कोहलीने त्याच्या चाहत्यांना निराश केले आणि विरोधकांना टीका करण्याची संधी दिली. भारतातील दिग्गज क्रिकेटपटूंनी कोहलीला विश्रांती द्यायला हवी असा सल्ला दिला होता. तर अनेक खेळाडूंनी कोहलीच्या समर्थनार्थ वक्तव्ये केली आहेत. अशातच भारतीय महिला संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा हिने देखील कोहलीची पाठराखण करून त्याचे कौतुक केले आहे. याशिवाय किंग कोहलीवर टीका करणाऱ्या मंडळीला चांगलेच सुनावले आहे.
विराट कोहली एक स्टार फलंदाज असून धावा करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे मात्र सध्या त्याला यश येत नाही. विराटला काय हवंय आणि त्याला काय करायचे आहे या सगळ्याची त्याला जाणीव आहे. त्यानुसार तो अभ्यास करत असून मला खात्री आहे की तो लवकरच त्याच्या फॉर्ममध्ये परतेल आणि सगळ्यांना सडेतोड उत्तर देईल असे अंजुम चोप्राने म्हटले.
३०-४० धावा करणाऱ्या खेळाडूंचा संघात समावेश अंजुप चोप्राने वृत्तसंस्था एनआयएला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले, "मी ३० ते ४० धावा करणारे खेळाडू देखील भारतीय संघात होते हे पाहिले आहे. कोहलीने अनेक उच्च स्थानी झेप घेतली आहे. मला खात्री आहे की तो भारतीय संघासाठी धमाकेदार पुनरागमन करेल." एकूणच अंजुने विराट कोहलीची पाठराखण केली असून त्याच्यावर टीका करणाऱ्या मंडळीला उत्तर दिले आहे.
विराट कोहलीच्या फॉर्मवरून रंगला वादविराट कोहली सध्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्याने त्याचे शेवटचे वैयक्तिक शतक जवळपास ३ वर्षांपूर्वी केले होते. कोहलीचा फॉर्म दिवसेंदिवस ढासळत असताना अनेक दिग्गजांनी त्याच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले होते. भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज कपिल देव यांनी आर अश्विनला कसोटी संघातून वगळल्याचा दाखला देत कोहलीला देखील वगळायला हवे असे म्हटले होते. मात्र अनेक आजी माजी खेळाडूंनी विराटच्या समर्थनात वक्तव्ये केली होती. दरम्यान कोहलीला वेस्टइंडिजविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून आगामी आशिया कपमध्ये त्याचा फॉर्म सुधारतो का ते पाहण्याजोगे असेल.