Join us  

"रोहित-विराटची जागा कोणीच घेऊ शकत नाही", कपिल देव यांचं रोखठोक मत, म्हणाले...

कपिल देव यांनी विराट-रोहितचे कौतुक केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 6:41 PM

Open in App

Kapil Dev On Virat Kohli And Rohit Sharma : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतली आहे. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करताना ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब उंचावला. या विजयानंतर रोहित, विराट आणि रवींद्र जडेजाने ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा नियमित कर्णधार कोण असेल याची क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव ही जोडी या शर्यतीत आघाडीवर आहे. अशातच भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव यांनी विराट-रोहितबद्दल रोखठोक मत मांडले. 

कपिल देव म्हणाले की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची कोणीच जागा घेऊ शकत नाही. ट्वेंटी-२० मध्ये त्यांची खेळण्याची पद्धत वेगळी होती. त्यामुळे मला वाटत नाही त्यांची कोण जागा घेऊ शकेल. प्रत्येकजण आपापल्या शैलीत क्रिकेट खेळत असतो. सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांची एक जोडी होती. त्याचप्रकारे विराट कोहली आणि रोहित शर्मा आहेत... त्यामुळे त्यांची कोणी जागा घेऊ शकत नाही. कपिल देव IANS या वृत्तसंस्थेशी बोलत होते. 

दरम्यान, २७ जुलैपासून श्रीलंका आणि भारत यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळेल. टीम इंडियाचा नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची ही पहिली परीक्षा असेल. आगामी मालिकेत विराट आणि रोहित भारतीय संघात दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक -पहिला सामना - २७ जुलै - संध्याकाळी ७ वा.दुसरा सामना - २८ जुलै - संध्याकाळी ७ वा.तिसरा सामना - ३० जुलै - संध्याकाळी ७ वा.

वन डे मालिकेचे वेळापत्रक - पहिला सामना - २ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.दुसरा सामना - ४ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.तिसरा सामना - ७  ऑगस्ट - दुपारी २.३० वा.

टॅग्स :कपिल देवरोहित शर्माविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ