Join us  

दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!

माजी पोलीस अधिकारी शरद कुमार यांच्यावर बीसीसीआयने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 6:56 PM

Open in App

दहशतवाद्यांचा कर्दनकाळ म्हणून ओळख असलेले माजी पोलीस अधिकारी शरद कुमार यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठी जबाबदारी सोपवली आहे. BCCI ने लाचलुचपत प्रतिबंधक युनिटच्या (Anti-Corruption Unit) प्रमुखपदी त्यांची निवड केली. भारतीय क्रिकेटमधील ही महत्त्वाची जबाबदारी आता सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी सांभाळणार असून, ते चार वर्षे दहशतवादविरोधी संघटनेचे (NIA) प्रमुख देखील राहिले आहेत. त्यामुळे निवृत्त ६८ वर्षीय IPS अधिकारी शरद कुमार हे आता नव्या भूमिकेत दिसतील, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली. 

उत्तर प्रदेशातील बरेली येथील शरद कुमार यांना तीन वर्षांसाठी बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख बनवण्यात आले आहे. २९ सप्टेंबर रोजी बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असल्याचे कळते. नवीन पद स्वीकारल्यानंतर क्रिकेटमधील भ्रष्टाचाराशी संबंधित समस्या सोडवण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतील. यामध्ये मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजी आदी प्रकरणांचा समावेश असेल. 

माजी IPS अधिकारी आता BCCI साठी काम करणार 

दरम्यान, निवृत्त आयपीएस अधिकारी शरद कुमार हे हरियाणा कॅडरचे १९७९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत आणि ते २०१३ ते २०१७ या काळात दहशतवादविरोधी संघटना अर्थात एनआयएचे प्रमुख होते. NIA मध्ये असताना त्यांची केंद्रीय दक्षता आयोगामध्ये आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. या पदावर ते जून २०१८ ते एप्रिल २०२० पर्यंत राहिले. एनआयएचे प्रमुख अधिकारी म्हणून काम करताना कुमार यांनी अनेक प्रमुख तपास आणि ऑपरेशन्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यकाळात एनआयएने जैश-ए-मोहम्मदच्या पठाणकोट एअरबेसवरील दहशतवादी हल्ल्यासह भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा तपास केला. एनआयएची क्षमता वाढवण्यातही शरद कुमार यांचे मोठे योगदान आहे. 

टॅग्स :बीसीसीआय