नवी दिल्ली : आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन फ्रँचायझींकडून खेळलेल्या भारतीय क्रिकेटपटूने पहिल्या प्रेयसीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळलेल्या केसी करिअप्पाने पहिल्या प्रेयसीविरोधात पोलिसात धाव घेतली. संबंधित प्रेयसीने त्याला त्याचे क्रिकेट करिअर संपवण्याची धमकी दिली होती, असा आरोप करिअप्पाने केला आहे. खरं तर क्रिकेटपटूच्या प्रेयसीने एक वर्षापूर्वीच पोलिसात तक्रार दिली होती. आता पुन्हा एकदा तिने आक्रमक होत करिअप्पाची आई आणि मोठा भाऊ यांच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.
२९ वर्षीय करिअप्पा बंगळुरूतील नागासंद्र येथे राहतो. त्याने बगलागुंटे पोलिसांना सांगितले की, त्याची कोडागू येथील २४ वर्षीय मुलीशी मैत्री आहे. त्यानंतर दोघांच्या मैत्रीचे नाते प्रेमात बदलले. पण, काही कालावधीनंतर हे नाते संपुष्टात आले. कारण की संबंधित तरूणी 'ड्रग ॲडिक्ट आणि मद्यपी'ची शिकार झाली होती.
करिअप्पाची पोलिसात धाव दरम्यान, या आधी मागील वर्षाच्या अखेरीस ३१ डिसेंबर २०२२ रोजी दिव्या (बदलले नाव) नावाच्या तरूणीने केसी करिअप्पाविरोधात याच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तेव्हा क्रिकेटरच्या प्रेयसीने गंभीर आरोप करताना म्हटले होते की, "करिअप्पाने तिला गर्भवती केले आणि सप्टेंबरमध्ये जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या." दिव्या 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तवाहिनीशी बोलत होती. तिने सांगितले की, केसी करिअप्पा हे प्रकरण उघड होऊ नये म्हणून समजावत होता आणि लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. पण, त्याची क्रिकेट कारकीर्द संपेल म्हणून मी पोलिसांना कोणतेही पुरावे दिले नाहीत. मी कोणताही पुरावा न दिल्याने पोलिसांनी बी अहवाल दाखल केला. तसेच त्याच्या नावावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या करून त्याची क्रिकेट कारकीर्द संपवण्याची धमकी दिली असल्याचा खुलासाही दिव्याने केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसी करिअप्पाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही गुन्हा दाखल केला आहे. दिव्याने सांगितले की, मला माझ्याविरोधातील तक्रारीची काहीच माहिती नाही, पण मी अखेरपर्यंत लढणार असल्याचे सर्वांना सांगितले आहे. शनिवारी तिने केसी करिअप्पा याच्याविरोधात आरटी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.