त्याला तीन कोटींचं कर्ज हवं होतं... एका एजंटनं कर्ज मिळवून देतो असं सांगून त्याच्याकडून दलाली घेतली... पण, कर्ज मिळवून देण्यात तो अपयशी ठरला... त्यानंतर पाठपुरवठा करूनही एजंटकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं त्याच्या अपहरणाचा कट रचला गेला... चार मित्रांना सोबतीला घेऊन त्यानं हा कट रचला, पण अपहरणाचा हा डाव त्याच्यावर उलटला... अपरहणाचा कट रचणारा मुंबईचा माजी क्रिकेटपटू निघाला...
मुंबईचा माजी क्रिकेटपटू रॉबीन मॉरिससह पाच इसमांना मुंबई पोलिसांनी अपहरणाचा कट रचल्याप्रकरणी अटक केल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलं आहे. मॉरिस आणि त्याच्या मित्रांचा अपहरणाचा डाव फसला खरा, परंतु त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्याचं, वृत्त देण्यात आले आहे.
कुर्ला पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यानं सांगितलं की,''काही वर्षांपूर्वी मॉरिसला तीन कोटींच कर्ज हवं होतं. एका ओळखीच्या मित्राच्या माध्यामातून मॉरिसची त्या एजंटशी ओळख झाली. तीन कोटींच्या लोनसाठी एजंटनं दलाली घेतली, परंतु लोन मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. त्यानंतर मॉरिसनं त्याच्या चार मित्रांसह एजंटच्या अपहरणाचा डाव रचला. एजंटला कुर्ल्यातील हॉटेलमध्ये बोलवून तेथून त्याला वर्सोवा येथे नेले. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांकडून दलालीची रक्कम मागितली. पण, कुटुंबियांनी अपहरणकर्त्यांना संपर्क न साधता थेट पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली.''
त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. 2018मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात मॉरिसचं नाव चर्चेत आले होते. पाकिस्तानचा माजी फलंदाज हसन रझानं अल जझीराच्या स्टींग ऑपरेशनमध्ये मॉरिसचं नाव घेतलं होतं. मॉरिसनं त्यावेळी सर्व आरोप फेटाळून लावले होते. मॉरिसनं 1995 ते 2007 या कालावधीत 42 प्रथम श्रेणी आणि 51 लिस्ट ए क्रिकेट सामने खेळले. इंडियन क्रिकेट लीगमध्ये त्यानं मुंबई चॅम्प संघाचे प्रतिनिधित्व केले होते.