AFG vs PAK । शारजाह : सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (PAK vs AFG) यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून अफगाणिस्तानच्या संघाने विजयी सलामीसह इतिहास रचला आहे. ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये अफगाणिस्तानच्या संघाने प्रथमच पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर संघाचा माजी खेळाडू शोएब अख्तरने राशिद खानच्या संघाचे कौतुक केले आहे. अख्तरने अफगाणिस्तानच्या संघाचे कौतुक करताना म्हटले की, आपल्या पठाण बंधूंनी हा सामना जिंकला याचा मला खूप आनंद आहे. मात्र, पाकिस्तानचा कर्णधार शादाब खानने निराश होऊ नये.
शारजाह येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाला अफगाणिस्तानविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. अफगाणिस्तानने पाकिस्तानचा सहा गडी राखून दारूण पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला निर्धारित 20 षटकांत 9 बाद केवळ 92 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने 17.5 षटकांत 4 गडी गमावून 94 धावा करून सामना आपल्या नावावर केला.
अफगाणिस्तानची गोलंदाजी उत्कृष्ट - शोएब अख्तरलाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. शोएब अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनेलवरील संभाषणात म्हणाला, "अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव करून बरोबर काटा काढला. अफगाणिस्तान संघ खूप मजबूत झाला आहे. त्यांचे फिरकी गोलंदाज आणि वेगवान गोलंदाज दोघेही चांगले आहेत. मोहम्मद नबीने शानदार गोलंदाजी केली. भारतात जेव्हा विश्वचषक होईल, तेव्हा अफगाणिस्तान एक मजबूत संघ म्हणून त्यात प्रवेश करेल. आमचे पठाण बंधू विजयी झाले याचा मला खूप आनंद आहे. मात्र, शादाब खानने धीर सोडू नये. तो खूप चांगला कर्णधार आहे आणि पुढच्या सामन्यात त्याने पुनरागमन केले पाहिजे." खरं तर या मालिकेत पाकिस्तानचे काही प्रमुख खेळाडू खेळत नाहीत. बाबर आझम, फखर झमान, शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ आणि मोहम्मद रिझवान यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"