जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 54 लाख 07,414 इतकी झाली असून 3 लाख 44,023 जणांना आपला प्राण गमवावे लागले आहेत. पण, 22 लाख 47,962 रुग्ण बरे झाले आहेत. पाकिस्तानातील कोरोना रुग्णांची संख्या 54,601 इतकी झाली आहे. 17,198 जण बरे झाले असून 1133 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पाकिस्तान क्रिकेटला धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या माजी फलंदाजाला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले असून त्यानं स्वत:ला घरातच क्वारंटाईन केलं आहे.
पाकिस्ताचा माजी फलंदाज तौफीक उमरला कोरोनाची लागण झाली आहे. 2014मध्ये त्यानं न्यूझीलंडविरुद्ध कसोटी संघाचे शेवटचे प्रतिनिधित्व केलं होतं. क्रिकेट पाकिस्तानच्या वृत्तानुसार उमरनं स्वतःला घरीच क्वारंटाईन केलं आहे. आतापर्यंत अनेक फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्तसमोर येत होते, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा पहिलाच पॉझिटिव्ह रुग्ण आहे.
2001मध्ये बांगलादेशविरुद्ध त्यानं पाकिस्तान कसोटी संघात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं 104 धावांची खेळू करून संघाला 264 धावांनी विजय मिळवून दिला होता. त्यानं 44 कसोटी आणि 22 वन डे सामन्यांत अनुक्रमे 2963 व 504 धावा केल्या आहेत. त्यानं कसोटीत 7 शतकं व 14 अर्धशतकं झळकावली आहेत, परंतु त्याला संघात स्थान कायम राखण्यात अपयश आले. 2016मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2018मध्ये त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटला रामराम केला. त्यानं 177 प्रथम श्रेणी सामन्यांत 10 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत.