विराट कोहली ( Virat Kohli) याच्याकडून वन डे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी काढून घेतल्यानंतर बरेच तर्क-वितर्क लावले जात आहेत. विराट कोहलीचे वन डेतील कर्णधार म्हणून चांगले रिकॉर्ड असतानाही बीसीसीआयनं घेतलेल्या या निर्णयाचा साऱ्यांनाच धक्का बसला. जेव्हा विराटनं ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याचे जाहीर केले, तेव्हा त्यानं वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट केले होते. तरीही बीसीसीआयनं त्याला हटवण्याचा निर्णय घेतला. आता रोहित शर्माकडे मार्यादित षटकांच्या संघांचे नेतृत्व असणार आहे, तर विराट कसोटी संघाचा कर्णधार राहणार आहे. या नाट्यमय घडामोडींवर पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कानेरिया ( Danish Kaneria) यानं मोठं विधान केलं आहे.
दानिश कानेरिया यानं विराटला कर्णधारपदावरून हटवण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर मत व्यक केलं. विराट कोहलीला बीसीसीआयनं जो सन्मान द्यायला हवा होता तो दिला नाही, असे कानेरिया म्हणाला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीमुळे हा निर्णय घेतला गेलाय, असेही तो म्हणाला. तो पुढे म्हणाला, विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं अनेक सामने जिंकले आहेत. अनिल कुंबळेसोबत विराटचं पटलं नव्हतं अन् जेव्हा राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून आला, तेव्हाच विराट व त्याची जोडी जमणार नाही हेही स्पष्ट झाले होते. रोहित शर्मा आता मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार बनला आहे. थोडं दिवस थांबा त्याच्याकडे कसोटीचेही कर्णधारपद जाईल.
''कर्णधार म्हणूनही आणि फलंदाज म्हणूनही विराटचे रिकॉर्ड जबरदस्त आहेत. त्यानं आयसीसी स्पर्धा जिंकली नसली तरी तो सुपरस्टार आहे आणि त्याचा सन्मान झालाच पाहिजे होता. जेव्हा सौरव गांगुलीनं मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची निवड केली, तेव्हाच कोहलीला हटवण्याचं षडयंत्र सुरू झाले. बीसीसीआय आता सोशल मीडियावरून विराटच्या कर्तृत्वाचे गुणगान गात आहे. पण, हा निर्णय घेण्यापूर्वी त्याच्याशी बोलणे त्यांना योग्य वाटले नाही,''असेही कानेरियानं विचारले.
बीसीसीआय अध्यक्ष काय म्हणाले...
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यानं रोहितच्या निवडीबाबत मौन सोडले. तो म्हणाला,''बीसीसीआय आणि निवड समितीनं मिळून हा निर्णय घेतला आहे. खरं सांगायचं तर ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नकोस ही विनंती बीसीसीआयनं विराटला केली होती. पण, त्यानं तेव्हा नकार दिला. त्यानंतर ट्वेंटी-२० व वन डे संघासाठी दोन वेगवेगळे कर्णधार नसावेत, अशी निवड समितीची भूमिका होती. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला.''
''विराटकडे कसोटी संघाचे नेतृत्व कायम ठेवण्याचा व रोहितकडे वन डे संघाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला गेला. बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून मी स्वतः विराटची चर्चा केली आणि निवड समिती प्रमुख हेही त्याच्याशी बोलले,''असेही गांगुलीनं ANI ला सांगितले.