सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊन पाकिस्तान टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला. यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhar) बाबर आझमच्या (Babar Azam) कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केला आहे. बाबर आझम अजूनही तरुण कर्णधार आहे आणि त्यामुळेच तो दबावाखाली त्याला चांगली कामगिरी करता आली नाही, असे शोएब म्हणाला. तो स्वत:ला शांत ठेवू शकला नाही आणि त्याला लक्षही केंद्रित करता आलं नसल्याचंही त्यानं सांगितलं. गुरुवारी खेळल्या गेलेल्या सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
"पाकिस्तानचा संघ घाबरला नव्हता, तर ऑस्ट्रेलियाचा संघ घाबरला होता. आपला कर्णधार नवा आणि तरूण आहे हे मानलं पाहिजे. तो स्वत:ला स्थिर आणि शांत ठेवू शकला नाही. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची टीम चांगली होती. त्यांनी आपल्या अनुभवाचा पूर्णपणे फायदा करून घेतला. बाबर आझम हा नवा कर्णधार आहे, परंतु त्यानं ६ पैकी ५ सामने जिंकले," असंही शोएब अख्तर म्हणाला.
"मला असं वाटतं की या विश्वचषकात पाकिस्ताननं विजय मिळवला पाहिजे होता. हा विश्वचषक सामना जिंकला पाहिजे होतं. आपल्याला कदाचित ही संधी पुन्हा मिळणारही नाही. आपल्या संघानं संपूर्ण प्रयत्न केले. परंतु इतके प्रयत्न भरपूर नव्हते. आपण चांगल्या संघांविरोधात सामने जिंकले आहेत," असंही त्यानं सांगितलं.