IPL 2023 । नवी दिल्ली : भारतात इंडियन प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे. अशातच पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (BCCI) टीकास्त्र सोडले आहे. बीसीसीआयला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळवायचे नसेल तर ही मोठी बाब नाही, कारण पाकिस्तानकडे शानदार खेळाडूंचा साठा असल्याचे खान यांनी म्हटले आहे. याशिवाय बीसीसीआय गर्विष्ठ बोर्ड असल्याचे इम्रान यांनी सांगितले.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हवाल्यानुसार इम्रान खान यांनी टाइम्स रेडियोला सांगितले, "जर भारताने पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएल खेळण्याची परवानगी दिली नसली तरी पाकिस्तानी खेळाडूंनी याबाबत चिंता करू नये. कारण आपल्याकडे चांगल्या खेळाडूंची संख्या सर्वाधिक आहे."
तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध खेदजनक आणि दुर्दैवी बाब आहे. भारत क्रिकेटच्या क्षेत्रात महाशक्ती बनला आहे, ते ज्याप्रकारे आमच्याशी व्यवहार करतात त्यात गर्विष्ठपणा असल्याची टीका खान यांनी केली. अन्य देशांच्या तुलनेत भारतात पैसा खूप आहे. त्यामुळेच ते महाशक्ती असल्यासारखे वावरत असून पाकिस्तानी खेळाडूंना नाकारत आहेत, असे खान यांनी अधिक म्हटले.
PCB vs BCCI 'सामना'खरं तर आशिया चषकाच्या यजमानपदावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात वाद सुरू आहे. आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार आशिया चषक 2023 ची स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले आहे. यावर पीसीबीचे तत्कालीन अध्यक्ष रमीझ राजा यांनी भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. अशातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) विश्वचषकासाठी आम्ही भारतात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच भारतात होणाऱ्या विश्वचषकातील आम्ही आमचे सामने बांगलादेशात खेळू असे काल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी सांगितले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"