नवी दिल्ली : पाकिस्तानच्या संघाला आशिया चषकात (Asia Cup 2022) पराभवाने सुरूवात करावी लागली. भारताविरूद्ध झालेल्या चुरशीच्या लढतीत हार्दिक पांड्याने षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर 148 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारतीय संघाने 5 बळी आणि 2 चेंडू राखून पूर्ण केले. पाकिस्तानच्या या पराभवानंतर माजी कर्णधार सरफराज अहमदने महिलापत्रकाराबद्दल एक ट्विट केले होते, ज्यानंतर वादाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, सरफराजने ट्विट करून लिहिले की, "17व्या षटकात स्लो ओव्हर रेटमुळे 5 फिल्डर सर्कलमध्ये होते आणि एका तथाकथित महिलापत्रकाराने नॅशनल टीव्हीवर चुरशीच्या लढतीनंतर पाकिस्तानच्या संघावर टीका करताना म्हटले होते की, धावाही नाही करत आणि झेलही नाही पकडत." सरफराजच्या या ट्विटमुळे नव्या वादाला सुरूवात झाली आहे.
सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या कर्णधारांनी निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्याने संपूर्ण संघाला शिक्षा झाली होती. त्यामुळे शेवटच्या तीन षटकांमध्ये 30 यार्डच्या सर्कलमध्ये 4 ऐवजी 5 फिल्डर ठेवावे लागले होते.
आशिया चषकात पाकिस्तानचा पुढील सामना हॉंगकॉंगविरूद्ध 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर भारतीय संघ 31 ऑगस्ट रोजी हॉंगकॉंगविरूद्ध मैदानात उतरेल. भारताने दुसऱ्या सामन्यात देखील विजय मिळवला तर संघाचे सुपर-4 मधील स्थान निश्चित होईल.