Wasim Akram on javed akhtar । नवी दिल्ली : प्रसिद्ध गायक आणि लेखक जावेद अख्तर फेब्रुवारीमध्ये त्यांनी पाकिस्तानमध्ये केलेल्या विधानामुळे चर्चेत आले होते. लाहोरमधील एका कार्यक्रमात त्यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाबाबत शेजारी देशावर सडकून टीका केली होती. जावेद अख्तर यांच्या या विधानावर आता पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रमने प्रतिक्रिया दिली आहे. खरं तर अक्रम 'मनी बॅंक गॅरंटी' या चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात करत आहे. लक्षणीय बाब म्हणजे या चित्रपटात अक्रमची पत्नी शनायरा देखील दिसणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी एका मुलाखतीत अक्रमला जावेद अख्तर यांच्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता.
आम्हाला भारतात यायला आवडेल - अक्रम वसीम अक्रमने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अख्तर यांच्या प्रश्नावर बोलताना म्हटले, "मी राजकीय विषयांवर भाष्य करू इच्छित नाही, कारण मी इथे माझ्या चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी आलो आहे. जर मला कोणत्या देशाने आमंत्रित केले तर मी त्याबद्दल फक्त सकारात्मक गोष्टी बोलेन." तसेच भारतात पाकिस्तानी संघातील खेळाडूंना मिळणाऱ्या प्रेमाबद्दल अक्रमला विचारले असता त्याने म्हटले, "मला जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा मी भारतात येईन. आम्हाला भारतात यायला आवडेल. मी वर्षातील ७-८ महिने तिथे राहायचो. मला माझे मित्र, लोक आणि जेवण आजही आठवते, तेथील सर्वात महत्त्वाचा डोसा जो आमच्या पाकिस्तानात नाही. इंशाअल्लाह, लवकरच मी तिथे जाईन, मी गेली अनेक वर्षे मिस केलेली सर्व ठिकाणे आणि मुंबईच्या हालचाली पाहायच्या आहेत."
दरम्यान, जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन तेथील कार्यक्रमात पाकिस्तानला सुनावले होते. ते म्हणाले होते की, "आम्ही नुसरत आणि मेहदी हसनसाठी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पण तुमच्या देशात लता मंगेशकर यांच्यासाठी कोणताही कार्यक्रम झाला नाही. जाऊद्या...आता एकमेकांना दोष देऊन फायदा नाही. आम्ही मुंबईचे लोक आहोत, आमच्या शहरावर हल्ला झालेला आम्ही पाहिला आहे. ते लोक नॉर्वेमधून किंवा इजिप्तमधून आले नव्हते. ते लोक अजूनही तुमच्या देशात फिरत आहेत. त्यामुळे ही तक्रार प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल, तर तुम्हाला वाईट वाटण्याचे काम नाही."
पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला सध्याच्या पिढीतील आपला आवडता भारतीय क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे. तसेच किंग कोहलीची नेतृत्व क्षमता देखील आवडते. विराट कोहली हा एक अप्रतिम खेळाडू असून मला त्याचा नेतृत्वगुण आवडतो, असे अक्रमने अधिक सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"