भारताकडून दारूण पराभव स्वीकारल्यानंतर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमच्या एका कृतीने चाहत्यांनी मनं जिंकली. शनिवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला. भारतीय गोलंदाजांच्या घातक माऱ्यासमोर पाकिस्तानने लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. बाबर आझमचा संपूर्ण संघ निर्धारित ५० षटके देखील खेळू शकला नाही आणि ४२.५ षटकांत १९१ धावांवर सर्वबाद झाला. १९२ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग भारतीय संघाने ११७ चेंडू शिल्लक असताना पूर्ण केला. भारताच्या विजयानंतर मैदानात एक अप्रतिम दृश्य पाहायला मिळाले. विराट कोहली आणि बाबर आझम यांची भेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.
दरम्यान, सामन्यानंतर बाबर आझमने विराटची भेट घेऊन त्याच्याशी संवाद साधला. यादरम्यान विराट कोहलीने स्वाक्षरी केलेली भारतीय जर्सी पाकिस्तानी कर्णधाराला भेट दिली. विराटने दाखवलेली खिलाडीवृत्ती पाहून चाहत्यांनी किंग कोहलीचे कौतुक केले. मात्र, पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमला ही गोष्ट खटकली. त्याने बाबर आणि विराटच्या भेटीवर प्रश्न उपस्थित करताला आपल्या कर्णधाराला सुनावले. मोठ्या पराभवानंतर बाबर आझमने मैदानात असे करायला नको होते, असे अक्रमने म्हटले.
बाबर-विराट भेट अन् अक्रम संतापला एका पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये क्रिकेट चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना अक्रम म्हणाला, "बाबर जर्सी घेत असल्याचे जेव्हा मी पाहिले तेव्हा मीच हेच सांगितले की, आज असे काही करण्याचा दिवस नव्हता. जर त्याच्या काकांच्या मुलाने कोहलीची जर्सी आणायला सांगितली असेल तर त्याने सामन्यानंतर ड्रेसिंगरूममध्ये याबद्दल चर्चा करायला हवी होती." एकूणच पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर बाबरने विराटची भेट घ्यायला नको होती असे वसिम अक्रमने नमूद केले.
भारताचा विजयरथ कायमपाकिस्तानी संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ४२.५ षटकांत सर्वबाद केवळ १९१ धावा केल्या. पाकिस्तानने दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरूवात केली. विश्वचषकात पदार्पण करत असलेल्या शुबमन गिलने काही चांगले फटकार मारले पण त्याला शाहीन आफ्रिदीने जास्त वेळ टिकू दिले नाही. मग कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारून ६३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.