Join us  

"पाकिस्तान फक्त सोशल मीडियावर...", रमीझ राजाचा संताप; कर्णधाराबद्दलच्या 'त्या' वक्तव्यावरुन वाद

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा माजी अध्यक्ष रमीझ राजाचा संताप.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 1:17 PM

Open in App

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा माजी अध्यक्ष रमीझ राजा त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. अलीकडेच पाकिस्तानने आपल्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध २-१ ने कसोटी मालिका जिंकली. पण, त्याआधी झालेल्या मालिकेचा दाखला देत रमीझ राजाने पाकिस्तानच्या सलग सहा पराभवांबद्दल भाष्य केले. तसेच यावेळी त्याने चाहत्यांसह माजी खेळाडू मोहम्मद आमिर यांच्यावर टीका केली. कारण रमीझ राजाने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान पाकिस्तानच्या कसोटी संघाचा कर्णधार शान मसूदला पराभवांबद्दल प्रश्न केला होता. या प्रश्नावर व्यक्त होताना शान गडबडला. खरे तर पाकिस्तानच्या निवडकर्त्यांनी चार नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रविवारी संघाची घोषणा केली. यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान याला बाबर आझम याच्या जागी वन डे आणि ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे. सलमान अली आगा याला भविष्यातील सर्व वन डे आणि ट्वेंटी-२० सामन्यांसाठी उपकर्णधार करण्यात आले आहे. 

रमीझ राजा म्हणाला की, पाकिस्तान जिंकतो तेव्हा आमच्यासारख्या समालोचकांचा सन्मानच होतो. मात्र, पाकिस्तानने सहा सामने गमावल्यानंतर एक सामना जिंकला. कर्णधार शान मसूदसोबत मी विविध बाबींबद्दल बोलत असतो. तो कसा बाद होतो यावर आम्ही चर्चा करत असतो. पण, पाकिस्तानी संघ एक सामना जिंकला की खूप हवेत जातो. मी हे सत्य मांडतो तेव्हा मला ट्रोल केले जाते. माझ्याबद्दल सोशल मीडियावर काहीही बोलले जाते. माझ्यावर दबाव टाकण्यासाठी राजकारण केले जाते. कोणीपण आजच्या घडीला क्रिकेटबद्दल ज्ञान देत आहे. कधी कधी तर असे वाटते की, पाकिस्तान फक्त सोशल मीडियावर जिवंत आहे. राजा त्याच्या युट्यूब चॅनलवर बोलत होता. 

कर्णधार म्हणून रिझवानचा मेलबर्न येथे पहिलाच सामना असेल. पीसीबीकडून सांगण्यात आले की, आगा झिम्बाब्वे दौऱ्यात टी-२० संघाचे नेतृत्व करणार आहे. कारण रिझवानला कार्यभार योजनेनुसार विश्रांती देण्यात येणार आहे. पाकिस्तानचा संघ २४ नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत झिम्बाब्वे दौऱ्यात तीन वनडे आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे. बाबर आझम, वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी इंग्लंडविरुद्ध दोन कसोटीत बाहेर राहिल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाकिस्तान संघात पुनरागमन केले आहे. 

टॅग्स :पाकिस्तानट्रोल