javed miandad on ram mandir : पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियाँदाद त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता त्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो दावा करतो की राम मंदिरात जाणारा व्यक्ती मुस्लिम म्हणूनच बाहेर येईल. तसेत त्याने या व्हिडीओत सांगितले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक काम चांगले केले आहे, ते त्यांच्या दृष्टीने चांगले आहे.
मियाँदादने सांगितले की, अयोध्येत राम मंदिर बांधून पंतप्रधान मोदींनी चूक केली आहे, पण ते आमच्यासाठी आशीर्वादाचे काम करेल. मला 'अल्लाह'वर पूर्ण विश्वास असून तोच ही अयोध्येतील राम मंदिराची जागा घेईल, जिथे मुस्लिमांचा आवाज घुमेल. ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर तीन दिवसांनी म्हणजेच ८ ऑगस्ट २०२० रोजीचा मियाँदादचा हा व्हिडीओ समोर आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट २०२० रोजी राम मंदिराचे भूमिपूजन केले होते. मात्र आता मियाँदादचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या आधी देखील पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी अजब विधानं करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये तो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबद्दल बोलत असतो. तसेच पंतप्रधान मोदींमुळे दोन्ही देशांमध्ये दुरावा असून याचा पाकिस्तानला काहीच फायदा होत नसल्याचे आफ्रिदीने म्हटले होते.