IND vs PAK : क्रिकेट म्हणजे भारतात जणू काही धर्मच... या धर्माचे कोट्यवधी भक्त आहेत. भारताशिवाय शेजारील पाकिस्तानात देखील क्रिकेटची भलतीच क्रेझ आहे. भारत आणि पाकिस्तान हे क्रिकेटच्या मैदानावर भिडतात तेव्हा अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतात. पण, हे कट्टर प्रतिस्पर्धी केवळ आयसीसी आणि आशिया चषकाच्या स्पर्धेत आमनेसामने येतात. मागील मोठ्या कालावधीपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. मात्र दोन्हीही संघांमध्ये मालिका व्हावी अशी इच्छा भारतीय कर्णधार रोहित शर्मासह पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार युनूस खानने याबद्दल बोलताना भारत आणि पाकिस्तानने क्रिकेटसाठी एकत्र यायला हवे असे म्हटले आहे.
युनूस खानने पाकिस्तानातील माध्यमांशी बोलताना म्हटले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका व्हायला हवी. केवळ एक-दोन सामने खेळवले जावेत या विचाराचा मी नाही. कारण विश्वचषकात जेव्हा हे दोन संघ भिडतात तेव्हा जो संघ हरतो तो दबावात जातो. त्यामुळे जर या संघांमध्ये मालिका झाली तर हा दबाव कमी होईल. भारत आणि पाकिस्तान सामन्यामुळे खेळाडू तयार होतात, त्यांना एक नवीन ओळख मिळते. या सामन्यात जो चांगली कामगिरी करतो तो स्टार बनतो. खेळासाठी, क्रिकेटसाठी दोन्हीही देशांनी एकत्र यायला हवे, खेळाडू एकत्र आहेतच पण सरकारांनी पण एकी दाखवायला हवी. दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांशी चर्चा करतात... मला वाटते की, सरकार आणि दोन्हीही देशाच्या क्रिकेट बोर्डांनी समोर येऊन याबाबत विचार करायला हवा.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होईल का? या प्रश्नावर रोहितने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते की, याबद्दल मला काही माहिती नाही. पण, मला वाटते की नक्कीच कसोटी मालिका व्हायला हवी. शेवटी मी देखील एक क्रिकेटर आहे. मला खेळायला आवडेल आणि आव्हान द्यायला आवडेल. मला कोणत्याही संघाविरूद्ध खेळायला आवडेल आणि पाकिस्तान हा एक चांगला संघ आहे. त्यांच्याकडे अप्रतिम गोलंदाज आहेत. एकूणच त्यांचा चांगला संघ आहे.
Web Title: former Pakistan cricket team capatain Younis Khan said India and Pakistan should play bilateral series regularly
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.