Join us  

...म्हणूनच राष्ट्र म्हणून पाकिस्तान खूप मागे आहे; राहुल द्रविडचे नाव घेत शोएब मलिकचं मोठं विधान

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकचा आपल्या संघाला घरचा आहेर.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 5:25 PM

Open in App

पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या मायदेशात बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. सलामीचा सामना गमावल्यानंतर दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत संपवण्याचे मोठे आव्हान यजमान पाकिस्तानसमोर आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानचे माजी खेळाडू पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर तोंडसुख घेत आहेत. आता माजी कर्णधार शोएब मलिकने पत्रकार परिषदेत बोलताना काही बाबींवर प्रकाश टाकला. शोएब मलिकला चॅम्पियन्स वन डे चषकासाठी स्टॅलियन्सचा मेंटॉर बनवण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, खेळाची जागरूकता आणि मार्गदर्शनाचा अभाव आहे. माझ्या परीने गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी आणि पाकिस्तानला काहीतरी परत देण्यासाठी मी ही भूमिका स्वीकारली असल्याचे मलिकने सांगितले.

शोएब मलिकला त्याच्या पगाराबद्दल प्रश्न केला असता त्याने संतप्त प्रतिक्रिया दिली. तुम्हाला माहिती आहे का राहुल द्रविड प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी किती पैसे घेतो? याची आपल्यापैकी कोणालाच कल्पना नाही. आपण इतरांच्या पगाराचा फार विचार करतो म्हणूनच एक राष्ट्र म्हणून पुढे जात नाही, असे शोएबने सांगितले. तसेच ट्वेंटी-२० विश्वचषकापूर्वी मला पाकिस्तानच्या निवडकर्त्याच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, पण मी अजूनही क्रिकेट खेळत असल्यामुळे नकार दिला. मी ज्या खेळाडूंसोबत खेळतो त्यांना मी कसे निवडू शकतो? मी पाकिस्तानमध्ये देशांतर्गत ट्वेंटी-२० स्पर्धा खेळत राहीन कारण मी अजूनही क्रिकेट खेळू शकतो, असेही त्याने सांगितले.

बाबर आझम तुझ्या संघाचा कर्णधार असेल तर तू काय करशील? या प्रश्नावर शोएब म्हणाला की, मी एक लीडर निवडेन. मी कर्णधार म्हणून ज्याला तयार करू शकतो अशा व्यक्तीची निवड करेन. माझ्यासाठी नेतृत्व कौशल्य वेगळे आहे. मी अशा व्यक्तीची निवड करेन जो पाकिस्तानसाठी भविष्यात यशस्वी कर्णधार ठरू शकेल. अहमद शहजाद आगामी स्पर्धेत खेळणार आहे, तर उमरान अकमलची अनुपस्थिती असेल. आपण पाकिस्तानच्या संघात केवळ वैयक्तिक कामगिरी पाहतो, पण पाकिस्तान संघ एक संघ म्हणून खेळताना दिसत नाही म्हणूनच पराभूत होतो, असेही मलिकने नमूद केले.

टॅग्स :शोएब मलिकपाकिस्तानराहुल द्रविड