भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याने नेतृत्वासंदर्भात जे मत व्यक्त केले होते, त्यावर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरनं असहमती दर्शवली आहे. कॅप्टन्सीचा मुद्दा डोक्यातून काढून गोलंदाजीवर फोकस कर, असा सल्लाही त्याने जसप्रीत बुमराह याला दिला आहे.
बुमराहनं कॅप्टन्सीवर केली होती 'बोलंदाजी'
जसप्रीत बुमराह याने एका मुलाखतीमध्ये रोखठोक मत व्यक्त करताना गोलंदाजांना नेतृत्वाची म्हणावी, तेवढी संधी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. यावेळी बुमराहनं भारताला पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कपिल देव यांच्यासह पाकिस्तानचा चॅम्पियन कर्णधार इम्रान खान या दिग्गजांचा दाखला दिला होता. पण बुमराहचं लॉजिक पाकिस्तानचे माजी क्रिकेटर बसित अली यांना पटलेले नाही. बुमराह याची ती कमेंट कशी चुकीची आहे, हे दाखवून देत त्यांनी भारतीय खेळाडूला गोलंदाजीवर लक्ष दे, असे म्हटले आहे.
तू सर्वोत्तम गोलंदाज आहेस, गोलंदाजीवर लक्ष दे!
बुमराहची कमेंट म्हणजे बाबर आझमला जशी कॅप्टन्सी आवडते तशा प्रकारचे आहे, असे म्हणत यावेळी त्यांनी बाबरलाही टोला हाणला. एवढेच नाही तर बुमराह हा सर्वोत्तम गोलंदाज आहे, त्याने नेतृत्वाच्या मागे न धावता गोलंदाजीवर लक्षकेंद्रीत करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
अष्टपैलूत्व सिद्ध केल्यामुळे ते यशस्वी ठरले
पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरनं नेतृत्वाच्या मुद्यामध्ये गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू यातील फरकही स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कपिल देव आणि इम्रान खान ज्यावेळी गोलंदाजाच्या रुपात संघात आले त्यावेळी त्यांच्याकडे नेतृत्व दिले नाही. ज्यावेळी त्यांनी स्वत:ला अष्टपैलूच्या रुपात सिद्ध केले त्यावेळी ते नेतृत्वाच्या रुपात पुढे आले. अष्टपैलू असल्यामुळेच ते यशस्वी ठरले, असेही बसित अली म्हणाले.
बुमराहला दिल्या शुभेच्छा
फार कमी गोलंदाज उत्तम कर्णधार किंवा प्रशिक्षक होऊ शकतात. पॅट कमिन्स त्यापैकी एक आहे, असेही बसिल अली म्हणाले आहेत. याशिवाय त्यांनी बुमराहला कॅप्टन्सीसाठी शुभेच्छाही दिल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याला नेतृत्वाची संधी मिळेल, असा उल्लेख त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये केला आहे.
बुमराहला मोजक्या सामन्यात मिळालीये कॅप्टन्सीची संधी
बुमराहनं 2022 मध्ये एजबॅस्टन येथील इंग्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारताच्या कार्यवाहू कर्णधाराची भूमिका बजावली होती. याशिवाय गतवर्षी आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेत त्याने भारताचे नेतृत्व केल्याचे पाहायला मिळाले होते. ही मालिका टीम इंडियाने २-० अशी जिंकली होती.