मुंबई : भारताचा जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला जगभरातील अव्वल गोलंदाजांपैकी एक समजला जातो. सध्याच्या घडीला जसप्रीत हा दुखापतीमुळे संघाच्या बाहेर आहे. या वर्षी तरी तो खेळू शकणार नाही, असे बोलले जात आहे. पण पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने जसप्रीतचा अपमान केल्याचे समोर आले आहे.
इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या प्रमुख गोलंदाजांनी बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका गाजवली. मर्यादित षटकांच्या सामन्यातही भारतीय संघात अनेक पर्याय आहेत आणि भुवनेश्वर कुमार फिट झाल्यामुळे त्याला अनुभवाची जोड मिळाली आहे. पण, सर्वांचे लक्ष लागले आहे ते जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाकडे. 2019मध्ये त्याचे पुनरागमन होणार नव्हतेच, परंतु ते 2020च्या सुरूवातीला टीम इंडियात परतेल, असा विश्वास होता. पण, तो अजूनही पूर्णपणे बरा झाला नसून त्याचे पुनरागमन लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकने जसप्रीतचा अपमान केल्याचे पाहायला मिळाले आहे. तो म्हणाला की, " मी ग्लेन मॅग्रा आणि वसिम अक्रमसारख्या जगविख्यात गोलंदाजांचा सामना केला आहे. त्यांच्यापुढे जसप्रीत हा तर बेबी बॉलर आहे."
दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेला सुरू होण्यासाठी एक आठवडा शिल्लक असताना बुमराहनं पाठिच्या खालच्या भागातील हाडाला फ्रॅक्चर झाल्यामुळे माघार घेतली. त्यानंतर तो उपचारासाठी लंडनमध्ये गेला होता, पण त्याच्यावर शस्त्रक्रीया करावी लागणार नसल्याचा दिलासा चाहत्यांना मिळाला होता. त्यानंतर मायदेशात परतलेला बुमराह तंदुरुस्तीसाठी कसून सराव करत आहे. बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून कमबॅक करेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. ही मालिका जानेवारीत होणार आहे. पण, प्रसाद यांच्या माहितीनुसार बुमराहचं पुनरागमन लांबणीवर पडले आहे.
डिसेंबरमध्ये विंडीजविरुद्धच्या मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका हे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. यापैकी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्याविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत बुमराह खेळणार नसल्याचं जवळपास निश्चित आहे. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे आणि तेथे दोन कसोटी, पाच ट्वेंटी-20 आणि तीन वन डे सामने खेळवण्यात येणार आहेत. बुमराह या दौऱ्यातून टीम इंडियात कमबॅक करेल, असा विश्वास प्रसाद यांनी बोलून दाखवला.